पिंपरी : पालिका कर्मचारी कामावर हजर; काळ्या फिती लावून काम सुरू | पुढारी

पिंपरी : पालिका कर्मचारी कामावर हजर; काळ्या फिती लावून काम सुरू

पिंपरी : जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपात सहभागी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्व कर्मचारी गुरुवारी (दि. 16) कामावर रुजू झाले. कर्मचार्‍यांनी काळ्या फिती लावून काम सुरू केले आहे. पालिकेत सध्या 7012 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी 3 हजार 996 कर्मचारी संपात सहभागी झाले होते. तर, 2 हजार 480 कर्मचारी संपात सहभागी झाले नव्हते. 536 कर्मचार्‍यांनी रजा/साप्ताहिक सुटी घेतलेली होती.

सलग दोन दिवसांपासून कर्मचार्‍यांचा संप सुरू होता. या पार्श्वभूमीवर आयुक्त शेखर सिंह यांनी जुनी पेन्शन योजना लागू असलेल्या कर्मचार्‍यांना तात्काळ कामावर हजर राहण्याचे आदेश बजावले होते. तसेच, हे कर्मचारी हजर न झाल्यास त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आज महापालिकेचे संपात सहभागी सर्व कर्मचारी कामावर रूजू झाले.

संपात सहभागी झालेले सर्व कर्मचारी आज सकाळी कामावर हजर झाले. आजपासून पुढील दोन दिवस हे कर्मचारी काळ्या फिती लावून काम करणार असल्याचे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

                              – विठ्ठल जोशी, उपायुक्त, महापालिका

अत्यावश्यक सेवेत महापालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाने काळ्या फिती लावून काम सुरू करण्याच्या सूचना गुरुवारी (दि. 16) कर्मचार्यांना केल्या. आम्ही संप अद्याप मागे घेतलेला नाही.

 – बबन झिंजुर्डे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड पालिका कर्मचारी महासंघ

Back to top button