पिंपरी : महापालिकापालिका प्रशासनाने सतर्क रहावे | पुढारी

पिंपरी : महापालिकापालिका प्रशासनाने सतर्क रहावे

पिंपरी : शहरात एच 3 एन 2 संसर्गाचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिकेने आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवावी. तसेच, कोणत्याही परिस्थितीत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी दक्षता घ्यावी, अशा सूचना भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिल्या आहेत. शहरात एच 3 एन 2 च्या संसर्गामुळे वृद्ध रुग्णाचा मृत्यू झाल्याचे कळल्यानंतर आमदार लांडगे मुंबई येथील अधिवेशनातून शहरात दाखल झाले. त्यानंतर महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याशी सायंकाळी महत्त्वपूर्ण बैठक घेतली.

या वेळी सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे उपस्थित होते. एच 3 एन 2 चा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. शहरातील प्रत्येक रुग्णालयामध्ये त्यासाठी 10 बेड राखीव ठेवावेत. ऑक्सिजन बेडची व्यवस्था करावी. नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत प्रशासनाने सर्वोत्तम आरोग्य सुविधा द्यावी. तसेच, संबंधित रुग्णाचा मृत्यू कशामुळे झाला? याबाबत नागरिकांमध्ये जागृती करावी, अशा सूचना आमदार लांडगे यांनी या प्रसंगी केल्या.

‘त्या’ रुग्णाचा मृत्यू अनेक आजारांमुळे
एच 3 एन 2 चा संसर्ग झाल्यामुळे एका वृद्ध रुग्णाचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, संबंधित वृद्ध नागरिक यांचे वयोमान आणि एकाचवेळी अनेक व्याधी यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. पण, भयभीत होऊ नये, असे आवाहन डॉ. गोफणे यांनी केले आहे.

कोविडसारखी परिस्थिती होणार नाही
एच 3 एन 2 संसर्गाबाबत महापालिका प्रशासनाने राज्य सरकारच्या निर्देशानुसार तयारी केली आहे. महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये राखीव बेड उपलब्ध आहेत. प्रसंगी एक रुग्णालय पूर्ण याच उपचारासाठी उपलब्ध केले जाईल. कोविडसारखी परिस्थिती होणार नाही. रुग्णसंख्या वाढल्यास शेवटचा पर्याय म्हणून वायसीएमसुद्धा उपचारासाठी खुले करण्यात येईल, अशी चर्चादेखील या बैठकीत झाली.

Back to top button