पुणे : इथेनॉलमुळे कारखान्यांना चांगले दिवस : साखर आयुक्त शेखर गायकवाड | पुढारी

पुणे : इथेनॉलमुळे कारखान्यांना चांगले दिवस : साखर आयुक्त शेखर गायकवाड

सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा :  ‘राज्यातील साखर कारखान्यांना इथेनॉलमुळे चांगले दिवस आले आहेत. यातून 1 लाख कोटी रुपये उलाढाल झाली. 46 हजार कोटी शेतकर्‍यांच्या खात्यावर, तर ऊसतोडणी कामगार व वाहतूकदार यांना 12 हजार कोटी रुपये मिळाले,’ असे राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले. सोमेश्वर कारखाना कार्यस्थळावर स्थलांतरित ऊसतोडणी मजूर कुटुंबांच्या प्रश्नावर आधारित ‘जीवनकोंडी’ या पुस्तकाच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते. दिग्दर्शक नागराज मंजुळे, सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्षा प्रणिता खोमणे, ज्येष्ठ संचालक राजवर्धन शिंदे, शिवाजीराव निंबाळकर, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, सरपंच अ‍ॅड. हेमंत गायकवाड, परेश मनोहर, संतोष शेंडकर, डॉ. भास्कर जेधे आदी मान्यवर उपस्थित होते.

‘साखर आयुक्त कार्यालयाने राज्यातील प्रत्येक कारखान्याकडून प्रतिटन 3 रुपयेप्रमाणे पैसे घेत ते ऊसतोडणी महामंडळाला दिले. साखर कार्यालयात सकाळी शेतकरी संघटना येतात, दुपारी कामगार संघटना येतात आणि संध्याकाळी चेअरमन येतात. त्यांचे काही ऐकू नका,’ असे सांगत त्यांनी ‘साखरेची कडू कहाणी’ यावर पुस्तक लिहा, असे सांगताच जोरदार खसखस पिकली.

‘स्थलांतर सहजासहजी होत नाही. त्याशिवाय माणसाची प्रगती होत नाही. ऊसतोडणी मजुरांना कायमस्वरूपी घरे मिळावीत यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. व्यवस्था दोन्ही बाजू बघत नाहीत,’ असे म्हणत त्यांनी व्यवस्थेवर बोट ठेवले. या वेळी सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी मनोगत व्यक्त केले. टीम आशा जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठानच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविक परेश जयश्री मनोहर यांनी केले. सूत्रसंचालन आकाश सावळकर यांनी केले. आभार सोमेश्वरचे संचालक ऋषिकेश गायकवाड यांनी मानले.

राज्यात साडेनऊ लाख ऊसतोड कामगार आहेत. राज्याच्या 18 जिल्ह्यातून ऊसतोड कामगार येत आहेत. पुढील दोन वर्षात 950 हार्वेस्टरच्या माध्यमातून ऊसतोड होणार असल्याने कामगारांची संख्या घटणार आहे. पुढील चार वर्षांत राज्यातील 45 टक्के ऊस हार्वेस्टरच्या माध्यमातून गाळप होणार आहे. एकट्या सोलापूर जिल्ह्याने 146 कोटी रुपये उचलीद्वारे गमावले आहेत.
                                                                 – शेखर गायकवाड, साखर आयुक्त

Back to top button