पुणे : अन् क्षणात आनंदाचे वातावरण बदलले दुःखात ! | पुढारी

पुणे : अन् क्षणात आनंदाचे वातावरण बदलले दुःखात !

शिरूर : पुढारी वृत्तसेवा :  शिरूर शहरात विशेष मतिमंद मुलांसाठी काम करणार्‍या राणी चोरे यांच्या कन्येचे विशेष मुलांच्या कार्यक्रमातच दुर्दैवी निधन झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. शिरूर शहरात आकांक्षा एज्युकेशनल फाउंडेशन ही संस्था विशेष मतिमंद मुलांसाठी गेल्या सात वर्षांपासून कार्यरत आहे. संस्थेच्या संस्थापिका राणी चोरे यांच्या दोन्ही मुली आकांक्षा (वय 21) आणि समीक्षा (वय 19) यांना एमपीएस या दुर्धर आजाराचे निदान वयाच्या सहाव्या वर्षी करण्यात आले. मुलींच्या प्रेरणेतून त्यांनी आकांक्षा एज्युकेशनल फाउंडेशनची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून विशेष मतिमंदत्व असलेल्या सेरेब्रल पाल्सी, डाऊन सिंड्रोम, ऑटीझम अशा विविध आजारांनी ग्रस्त मुलांना समाजात सन्मानाने जगता यावे, यासाठी प्रशिक्षण व संगोपन केले जात आहे.

राणी चोरे यांची द्वितीय कन्या समीक्षा ही गेल्या काही दिवसांपासून एमपीएस आजाराशी झुंज देत होती. कुठलाही वैद्यकीय इलाज होत नसल्याने डॉक्टरांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. अशातच आकांक्षा फाउंडेशनचा सातवा वर्धापन दिन बुधवारी (दि.15) सायंकाळी शिरूरमधील नगरपालिका मंगल कार्यालयात आयोजित केला होता. विशेष मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना समीक्षा ही अचानक अत्यवस्थ झाली. रक्ताच्या उलट्या सुरू झाल्यानंतर तिला तत्काळ खासगी दवाखान्यात दाखल केले. उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली.

कार्यक्रमादरम्यान सभागृहात दु:खाची लाट
एकीकडे संस्थेचा कार्यक्रम सुरू असताना दुसरीकडे समीक्षाचा मृत्यू झाल्याची वार्ता कळताच संपूर्ण सभागृहात दुःखाची लाट पसरली. क्षणात संपूर्ण वातावरण गंभीर झाले. रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात डोंगरगण येथे अंत्यविधी करण्यात आला. समीक्षा हिच्या निधनाने शिरूर शहर व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Back to top button