पुणे : ‘पेन्शन द्यायचीच तर जगाच्या पोशिंद्याला द्या’ ; नेटीझन्सची भावना | पुढारी

पुणे : 'पेन्शन द्यायचीच तर जगाच्या पोशिंद्याला द्या' ; नेटीझन्सची भावना

नायगाव : पुढारी वृत्तसेवा : जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी राज्य सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. मात्र, काही सरकारी कर्मचारी शेतकरी व सर्वसामान्यांना ज्या भावनाशून्यतेने वागणूक देतात, त्याचे ठळक प्रतिबिंब आता सोशल मीडियावरून व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांवरून दिसू लागले आहे. मपेन्शन द्यायचीच तर जगाच्या पोशिंद्याला द्या, भरमसाठ वेतनधारकांना कशाला? अशा प्रतिक्रियांचा पाऊस सध्या सोशल मीडियावर पडू लागला आहे. पैसा दिल्याशिवाय काम न करणे, लाच घेणे, कामास विलंब करणे, हेलपाटे मारण्यास भाग पाडणे, तुच्छ वागणूक देणे, दखल न घेणे, काही ठराविक एजंटांमार्फत आलेलीच कामे करणे, वेठीस धरणे, एखाद्याची क्षमता नसली तरी ओरबाडून घेणे, अनावश्यक शेरे काढणे, नियमाचा बाऊ करणे, मात्र त्याचवेळी प्रभावशाली व्यक्तींसाठी नियम पायदळी तुडवत त्यांना पायघड्या घालणे, बड्यांच्या चिठ्ठी-चपाटीशिवाय फाईल न हलवणे असे कितीतरी प्रकार सरकारी कार्यालयांत गेल्यावर सर्वसामान्यांना पाहायला मिळतात.

काही ठराविक सरकारी कर्मचार्‍यांची बेशिस्त व बेकायदा वागणूक याला कारणीभूत असते. याचा परिणाम सरसकट कर्मचार्‍यांची प्रतिमा खराब होण्यावर होतो, यामुळे हक्कासाठी संपावर गेलेल्या शिस्तप्रिय कर्मचार्‍यांना सर्वसामान्य व शेतकर्‍यांच्या टीकाटिप्पणींना सामोरे जावे लागत आहे. याचप्रमाणे वेळेवर वीज नाही, पिकांना मुबलक पाणी नाही अन् मिळालेच तर त्याला प्रमाण नाही, अशा अडचणींचं गाठोड कायमचं नशिबी वागवणार्‍या शेतकर्‍यांचा शेतातील माल बाजारापर्यंत विक्रीसाठी गेला, तर त्याला बाजारभाव मिळत नाही. अशा एक ना अनेक समस्यांचा सामना जगाच्या पोशिंद्याला तिन्ही ऋतूत करावा लागतो.

या समस्यांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या जगाच्या पोशिंद्याला मात्र संपावर न जाता फासावर लटकावं लागतं. त्यामुळे पेन्शन द्यायचीच तर जगाच्या पोशिंद्याला द्या, भरमसाठ वेतन असूनदेखील कामचुकारपणा, भ्रष्टाचार करणार्‍या व ज्यांना जनतेच्या कामाचे काही देणेघेणे नाही, रुग्णांच्या जिवाची पर्वा नाही, गुणवत्तेचे देणेघेणे नाही अशा बेशिस्त कर्मचार्‍यांना नको. शासनाने नवीन नोकरभरती करावी, अशा एक ना अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिल्या जात आहेत.

Back to top button