पेठ आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवा कोलमडली | पुढारी

पेठ आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवा कोलमडली

जुनी पेन्शन योजना मिळावी यासाठी पेठ (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी, कर्मचारी मंगळवार (दि. 14) पासून बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे सातगाव पठार भागातील आरोग्ययंत्रणा कोलमडली आहे.
सातगाव पठार भागात कुरवंडी, भावडी, पेठ, कारेगाव, पारगाव आदी भागातील रुग्णांची पेठ आरोग्य केंद्रात गर्दी होत होती. मात्र, येथील अधिकारी व कर्मचारी संपावर गेल्याने या आरोग्य केंद्रातील आरोग्यसेवा खंडित झाली आहे. रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे. लवकरात लवकर संप मिटावा, अशी मागणी रुग्णांकडून होत आहे.

संपावर गेलेल्यांमध्ये संजय शिंगाडे, दत्तात्रय श्रीगाधी, अविनाश सुरूषे, निखिल इंगोले, काळुराम नवले, मनीषा वाघ, सुनंदा राऊत, वर्षा बदमंजी, सुनंदा गभाले, नंदा पिंगळे व इतर आरोग्यसेविकांचा समावेश आहे. संबंधितांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नीलम घोडके यांना याबाबतचे निवेदन दिले आहे.

तालुक्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी घोडेगाव येथील पंचायत समिती कार्यालयात ठिय्या मांडून बेमुदत संप पुकारला आहे. शासनाकडून जोपर्यंत जुनी पेन्शन योजना मिळत नाही तोपर्यंत बेमुदत संप सुरू राहणार आहे, असे आरोग्य तंत्रसहायक मनीषा वाघ यांनी सांगितले. उपलब्ध आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांच्यामार्फत रुग्णांना आरोग्यसेवा पुरविण्यात येत आहे. मात्र, संपामुळे मनुष्यबळ कमी असल्याने आरोग्यसेवेत अडचणी येत आहेत, असे आरोग्य अधिकारी डॉ. नीलम घोडके यांनी सांगितले.
तर शासनाने लवकर संप मिटवावा. गोरगरीब रुग्णांना खासगी उपचार घेण्यासाठी आर्थकि अडचण येत आहेत. लवकरात लवकर आरोग्यसेवा सुरळीत करावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विलासराव रासकर यांनी केली आहे.

आंबेगावातील आरोग्य सेवा ठप्प

राज्य सरकारच्या रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी व परिचारकांच्या बेमुदत संपामुळे आंबेगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, तालुकास्तरीय आरोग्य केंद्रातील रुग्णसेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. त्यामुळे आजारी नागरिक व त्यांचे नातेवाईक यांना प्रचंड मनस्ताप होत आहे. अत्यवस्थ स्थितीतील रुग्णांवर वैद्यकीय अधिकारी काही आरोग्य केंद्रात उपचार करीत आहेत. आंबेगाव तालुक्यात निरगुडसर, महाळुंगे पडवळ, घोडेगाव, डिंभे येथे तालुकास्तरीय प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. मंचर येथे उपजिल्हा रुग्णालय आहे. लांडेवाडी, साकोरे, कळंब, पेठ, शिनोली, लोणी धामणी, पारगाव, रांजणी या भागांत सुमारे 27 उपकेंद्र कार्यरत आहेत.

या आरोग्य केंद्रांमध्ये औषध निर्माण अधिकारी, परिचारक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे बाह्य रुग्णसेवा बंद आहे. अत्यवस्थेतील रुग्णांवर उपचार केले जात असल्याचे चित्र काही प्राथमिक आरोग्य केंद्रात पाहावयास मिळाले.
राजपत्रित आरोग्य कर्मचारी संघटना वैद्यकीय अधिकारी दि. 27 पासून संपावर जाणार असल्याने वैद्यकीय सेवा पूर्णपणे बंद होण्याची शक्यता आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व जिल्हा आरोग्य समितीचे तत्कालीन सदस्य डी. के. ऊर्फ दादाभाऊ चासकर म्हणाले, की रुग्णांना वेठीस धरून संप करणे कितपत योग्य आहे. शासनाने चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांचा पेन्शनचा मुद्दा त्वरित निकालात काढावा. इतर राज्याप्रमाणे कर्मचार्‍यांना न्याय द्यावा. आजारी नागरिकांची होणारी ससेहोलपट थांबवावी.

संपामुळे आरोग्य केंद्रातील रुग्णसेवा ठप्प

शासकीय कर्मचार्‍यांच्या संपामुळे सणसर प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांची सेवा ठप्प झाली आहे. सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना खासगी दवाखान्याच्या पायर्‍या चढाव्या लागत आहेत.
सणसर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारीही संपावर गेले आहेत. सणसर प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर शासकीय कर्मचार्‍यांचा संप सुरू असल्याचा फलक लावला आहे. परिणामी, सामान्य कुटुंबातील रुग्णांना खासगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी जावे लागत आहे. खासगी दवाखान्यात पाचशे ते हजार रुपये खर्च करावे लागत असल्याने सामान्य माणसांच्या खिशाला कात्री लागली आहे. शासकीय आरोग्यसेवा ही गोरगरिबांसाठी अत्यावश्यक सेवा आहे.
शासकीय कर्मचार्‍यांच्या संपामुळे सर्वसामान्य जनता भरडली जात आहे. शासनाने चर्चेचे गुर्‍हाळ न करता लवकरात लवकर मार्ग काढून संप मिटवावा व शासकीय सेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी शिवसेनेचे तालुका उपप्रमुख विजय शिरसट यांनी केली आहे.

परिंचेतील आरोग्य केंद्रात शुकशुकाट कंत्राटी डॉक्टर व नर्स यांचा रुग्णांना आधार

जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या राज्यस्तरीय संपात पुरंदर तालुक्यातील बहुतांशी आरोग्य केंद्रांतील तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी सहभाग घेतला आहे. परिंचे आरोग्य केंद्रातील कर्मचारी संपावर गेल्यामुळे येथील आरोग्य उपकेंद्र ओस पडलेले आहे. संपाची माहिती अनेक लोकांना माहिती पडल्यामुळे अनेक सर्वसामान्य रुग्णांनी खासगी डॉक्टरांकडे जाणे पसंत केले. त्यामुळे त्यांना थोडा मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला.

परिंचे येथील आरोग्य केंद्रामध्ये एकूण 30 कर्मचारी आहेत. त्यातील गट मकफ मधील 25 कर्मचारी संपावर गेले आहेत, तसेच गट मडफ मधील शिपाई, रुग्णवाहिका चालक असे दोन लोक संपावर गेले आहेत. त्यामुळे पंचक्रोशीतील सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सध्या या आरोग्य केंद्रामध्ये लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून कंत्राटी पद्धतीच्या तीन सिस्टर महिला कर्मचारी व एक आरोग्य समुदाय अधिकारी हे काम पाहत आहेत. त्यामुळे बुडत्याला काठीचा आधार असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. संपाच्या काळात ग्रामीण भागातील लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून, तसेच अत्यावश्यक विभागात रुग्ण आल्यानंतर उपचार देण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत, असे गट ब चे परिंचे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. फोले यांनी सांगितले.

Back to top button