पुणे : जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; पिकांचे नुकसान | पुढारी

पुणे : जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; पिकांचे नुकसान

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह संपूर्ण जिल्ह्याला पावसाने तडाखा दिला. त्यामुळे जिल्ह्यात रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात सरासरी 4.5 ते 6 मी.मी. पावसाची नोंद झाली. दरम्यान, आगामी चार दिवस राज्यात पावसाळी वातावरण राहणार आहे. 20 मार्चपर्यंत संपूर्ण राज्याला ‘यलो अलर्ट’, तर पुण्यासह 11 जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. 20 मार्चपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

गुरुवारी सलग दुसर्‍या दिवशी पुणे, पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण जिल्ह्यात अवकाळी पावसाने दाणादाण उडवून दिली. वादळी वार्‍यासह काही भागांत गारा पडल्या, त्यामुळे काढणीस आलेल्या गव्हाचे मोठे नुकसान झाले. वादळी वार्‍यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली, वीजतारा तुटल्या. त्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाला. वीटभट्टी व्यावसायिकांचे नुकसान झाले. जनावरांचा चारा भिजला. जिल्ह्यात भोर, वेल्हे, दौंड, मुळशी तालुक्यात आंबा बागांचे नुकसान झाले. पुणे शहरात सरासरी 3.5 मि. मी. तर पिंपरी चिंचवडमध्ये 7 मि. मी. पावसाची नोंद झाली.

लवासा येथे 35 मि. मी पाऊस
शहरासह पिंपरी-चिंचवड आणि संपूर्ण जिल्ह्यात जोरदार पावसाने दाणादाण उडवून दिली. सर्वाधिक पावसाची नोंद लवासा (35 मि.मी.) इतकी झाली. त्यानंतर गिरीवन (17.5मि.मी.) पावसाची नोंद झाली. देशात सध्या पाऊस सुरू आहे. यातही प्रामुख्याने गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात पावसाचा जास्त जोर आहे. यातही महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात 18 मार्चपर्यंत पावसाचा इशारा होता; मात्र पावसाचा मुक्काम दोन दिवसांनी वाढला आहे.

‘ऑरेंज अलर्ट’
पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वाशिम व वर्धा.
‘यलो अलर्ट’
कोल्हापूर, धुळे, नंदुरबार, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली व जालना.

Back to top button