पुणे : संपावरील कर्मचार्‍यांची समाजमाध्यमांवर खिल्ली ; जनता सुनावतेय खडे बोल | पुढारी

पुणे : संपावरील कर्मचार्‍यांची समाजमाध्यमांवर खिल्ली ; जनता सुनावतेय खडे बोल

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक हे ग्रामीण भागातील नागरिकांच्या संपर्कातील शासकीय कर्मचारी. पण याच कर्मचार्‍यांनी केलेल्या संपाला सर्वसामान्य नागरिकांकडून पाठिंबा मिळताना दिसत नाही. नागरिकांना शासकीय काम करताना आलेल्या अनुभवाचा उल्लेख करून अनेकांनी संपावर गेलेल्या कर्मचार्‍यांना समाजमाध्यमातून खडे बोल सुनावले आहेत. तर अनेकांनी संपाची खिल्लीदेखील उडवली आहे. समाजमाध्यमावर व्हायरल झालेल्या एका वाहनतळावरील छायाचित्रात केवळ पाच ते सहा दुचाकी तर मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहने आहेत. या छायाचित्राच्या खाली ‘जुनी पेन्शन मागायला आलेल्या गरीब लोकांच्या मोर्चातील गाड्यांचे पार्किंग‘, अशी कॅप्शन लिहिली आहे. व्हिडिओ, छायाचित्रांच्या माध्यमातून अनेकांनी मिम्स बनवून शासकीय कर्मचार्‍यांच्या संपाची खिल्ली उडवली आहे.

”थोडं तरी घाबरा,

नोकरीला असलेले दोघे नवरा बायको एकाच घरात राहून दोन ठिकाणी घर भाडे उचलत आहात, याला हक्क आणि सत्य म्हणावे का?”, ”लोक तुमच्या पेंशनला नाही तर आपल्याला मिळणार्‍या गलेलठ्ठ पगार आणि इतकं असूनही आपण वेळेत काम करत नाही यावर नाराज आहेत. चांगलं काम करणार्‍यां साठी आजही लोक हार घेऊन येतात.‘ ‘संपातील तलाठी : आम्ही पण शेतकरी पुत्र आहोत, शेतकर्‍यांचा फोन उचलायला तुला जड जातंय, तुम्ही सासुरवाडीला जाऊन तालुक्याला मीटिंगला आलोय असं सांगता आणि आज शेतकर्‍याच्या आडून सहानुभूती पाहिजे तुम्हाला‘.

अशा अनेक पोस्ट समाजमाध्यमावर संपाच्या पहिल्या दिवसापासून पोस्ट करण्यात येत आहेत. एसटी कर्मचार्‍यांच्या संपकाळात सर्वसामान्य नागरिकांमध्ये कर्मचार्‍यांप्रती जी सहानुभूती दिसून आली, ती या शासकीय कर्मचार्‍यांच्या संपाच्या कालावधीत दिसून येत नाही. दरम्यान, यावर एका संघटनेचे पदाधिकारी म्हणाले, ’आम्ही आमच्या मागण्यांसाठी संप केला आहे. या मागण्या बरोबर आहेत, आम्हीही सामान्य नागरिकच आहोत. नागरिकांनी ही आमचे म्हणणे समजून घ्यावे.’

Back to top button