पुणे : राज्यव्यापी संपाच्या तिसर्‍या दिवशी शस्त्रक्रिया, आयसीयू ठप्प | पुढारी

पुणे : राज्यव्यापी संपाच्या तिसर्‍या दिवशी शस्त्रक्रिया, आयसीयू ठप्प

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्यव्यापी संपाच्या तिसर्‍या दिवशी ससून रुग्णालय आणि औंध जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनी काम न केल्याने रुग्णसेवा आणि शस्त्रक्रियांमध्ये अडथळा निर्माण झाला. नियोजित शस्त्रक्रिया आणि आयसीयू सेवांना सर्वाधिक फटका बसला.
औंध जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनाने कंत्राटी परिचारिकांना ’नॅशनल हेल्थ मिशन’ अंतर्गत आणण्याचा निर्णय घेतला आणि ’आरबीएसके’ मध्ये काम करणार्‍या आरोग्य सेविकांना पाचारण करून मनुष्यबळाची कमतरता भरून काढली. ससून रुग्णालयात एका महिन्याच्या कालावधीसाठी खाजगी एजन्सीकडून कंत्राटी पद्धतीने परिचारिकांची भरती करण्यात आली.

औंध जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक म्हणाले, ‘औंध रुग्णालयात सध्या 78 पेक्षा जास्त कर्मचारी परिचारिका संपावर आहेत त्यामुळे आम्ही आमच्या महाविद्यालयातील 40 परिचारिका आणि विविध योजनांमधील 30 वरिष्ठ महिला आरोग्य कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे.’

आमच्या रुग्णाला मेंदूत गाठ असल्याने ससूनमध्ये अ‍ॅडमिट केले आहे. वार्डबॉय नसल्याने तपासणीसाठी आम्हीच तिला घेऊन इकडून तिकडे जात आहोत.
                                                 – सलमा सय्यद, रुग्णाच्या नातेवाईक

आम्ही 60 परिचारिकांना करारावर रुजू करून घेतले आहे. त्या शुक्रवारपासून रुजू होणार आहेत. आम्ही आमच्या पॅरामेडिकल स्टाफ आणि सध्याच्या कर्मचार्‍यांना रुग्णांची काळजी घेण्यासाठी प्रशिक्षित केले आहे. संपामुळे कामकाजावर परिणाम होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत.
                                        डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, ससून रुग्णालय

Back to top button