पुणे : म्हाडाच्या 6058 सदनिकांची सोमवारी सोडत | पुढारी

पुणे : म्हाडाच्या 6058 सदनिकांची सोमवारी सोडत

पुणे : पुढारी वृत्तसेवा पुणे मंडळातर्फे वीस टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्यांतर्गत 2938 सदनिका, 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत 2483 सदनिका व प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 637 सदनिका अशा एकूण 6058 सदनिकांची ऑनलाइन सोडत सोमवारी (दि. 20) काढण्यात येणार आहे. सदनिकांची ऑनलाइन सोडत उपमुख्यमंत्री, तथा गृहनिर्माणमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काढण्यात येणार आहे. या वेळी उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली तसेच गृहनिर्माण प्रधान सचिव वल्सा नायर सिंह व उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि. 20) सकाळी 11 वाजता उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या दालनात व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे ऑनलाइन पध्दतीने पार पडणार आहे. ऑनलाइन सोडतीचा कार्यक्रम पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, गृहनिर्माण
भवन, आगरकर नगर, पुणे- 1 येथे होणार आहे.

संगणकीय सोडतीसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनचा प्रारंभ जानेवारीमध्ये पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन माने पाटील यांच्या हस्ते पुणे येथे पार पडला होता. पुणे मंडळामार्फत काढण्यात येत असलेल्या 6058 सदनिकांसाठी 58467 अर्जदारांनी अर्जाची अनामत रक्कम भरून सहभाग नोंदविला आहे, अशी माहिती माने-पाटील यांनी दिली.

Back to top button