पिंपरी : शरीराला थंडावा देणार्‍या आहाराकडे कल | पुढारी

पिंपरी : शरीराला थंडावा देणार्‍या आहाराकडे कल

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : मार्च महिन्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. पुढील दोन महिने तर कडक उन्हाळ्याचे असणार आहेत. त्यामुळे उन्हाळा सुकर करण्याकडे नागरिक उपाययोजना करत असतात. वाढते तापमान शरीरासाठी त्रासदायक ठरू नये, म्हणून नागरिक तापमानाला नियंत्रण करेल, असा आहार शरीराला देण्याकडे कल दिसून येत आहे.

पिंपरी चिंचवडचे कमाल तापमान 35 ते 36 अंशा इतके वाढत आहे. सकाळी दहा वाजल्यानंतर कडक ऊन व रात्री देखील उकाडा असा अनुभव शहरवासीयांना येत आहे. त्यामुळे शरीर थंड राहील याकडे लक्ष दिले जात आहे. वातावरणात उकाडा वाढला की, काहीही खावेसे वाटत नाही. आपला रोजचा आहार अगदी नकोसा होऊ लागतो. त्यामुळे उन्हाळ्यातील

आहारदेखील बदलायला हवा.
मार्च, एप्रिल, मे महिने हा अधिक त्रासदायक असतात. त्यामुळे नुसती फॅन व एसी, कुलरच्या थंड हवेने शरीराला वरून थंडावा मिळतो, पण उन्हाळ्यात शरीर आतूनही थंड होणे तितकेच महत्त्वाचे असते. उन्हाळ्यातील आहारात धान्य आणि डाळी, सलाड नाचणी, मूग, ज्वारी अशा थंडप्रवृत्तीच्या घटकांचा समावेश केला जात आहे. तसेच जेवणात काकडी, गाजर, मुळा, कोबी अशा थंड भाज्यांचा भरपूर प्रमाणात वापर होत आहे. उन्हाळ्यामध्ये खास अशा भाज्या येत नाहीत. तर मेथी, पालक, चवळई, अंबाडी अशा पालेभाज्यांची खरेदी मोठ्या प्रमाणत नागरिक करत आहेत. उन्हाळ्यात मसालेदार खाण्याऐवजी पालेभाज्या आणि वरण भात, साजूक तूप असा हलका आहार घेतला जात आहे.

योगासने व प्राणायाम
सर्वच ऋतूमध्ये व्यायाम गरजेचा आहे. मात्र, उन्हाळ्यात अतिकष्टाचे व्यायाम करणे जमत नाही. किंबहुना ते करू नयेच, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. कारण अतिकष्टाच्या व्यायामाने घामामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यासाठी योगासने व प्राणायाम किंवा झेपेल तितकाच व्यायाम करावा करण्याचा सल्ला दिला जातो.

थंड पेयांना मागणी वाढली
दुपारी कडक उन्हामुळे नागरिक जेवणात दही व ताक यांचा समावेश करत आहेत. तसेच लिंबू सरबत, कोकम सरबत, नारळपाणी, कैरी पन्हे, लस्सी, फळांचे रसाचे सवेन केले जात आहे. याकाळात महिला लिंबाचा रस तयार करतात. त्यामुळे लिंबांना मागणी वाढली आहे. दुकानांमध्ये देखील फळांच्या सरबतांना मागणी वाढली आहे.

Back to top button