मावळ भाजप मिशन 2024 पूर्ण ताकदीने लढणार !

मावळ भाजप मिशन 2024 पूर्ण ताकदीने लढणार !
Published on
Updated on

वडगाव मावळ : राज्य सरकारने अर्थसंकल्पात सुरू केलेल्या शासकीय योजनांचा प्रसार करण्यासाठी आजपासून 'महाविजय संकल्प 2024' सुरू करण्यात आले असल्याची माहिती देऊन मिशन 2024 ला भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीने सामोरे जाणार असल्याचा विश्वास भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

वडगाव मावळ येथील भाजपच्या झालेल्या पत्रकार परिषदेस माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, प्रशांत ढोरे, गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम, रामदास गाडे, गणेश कल्हाटकर, बाळासाहेब घोटकुले, देवराम सातकर, भगवान सातकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संदीप काकडे, भाजप शहराध्यक्ष अनंता कुडे, विनायक भेगडे आदी उपस्थित होते. भेगडे पुढे म्हणाले, सन 2019 निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांना उभारी देण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून झाले, त्यानंतर कोरोना काळात पक्षाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात आले. राज्य सरकारने पंचामृत अर्थसंकल्प सादर करताना नवनवीन योजना आणल्या आहेत.

यामध्ये आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्या मानधनात वाढ, नमो शेतकरी महासन्मान योजना, महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत, हर घर जल हर घर स्वच्छता, समृद्ध आरोग्य समृद्ध महाराष्ट्र, धनगर समाजाला 1 हजार कोटी, शेतमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकर्‍यांना निवारा, भोजन, एक रुपयात पीकविमा, मागेल त्याला शेततळे, लेक लाडकी योजना या सर्व योजना तळागाळापर्यंत पोचविण्यासाठी महाविजय संकल्प अभियान राबविण्यात येणार आहे.

हे अभियान दि.15 व 16 रोजी इंदोरी, सोमाटणे गण, दि.17 रोजी टाकवे गण, दि.18 रोजी वडेश्वर गण, दि.19 रोजी वडगाव ग्रामीण ,दि.20 रोजी खडकाळा गण, दि.21 रोजी कुसगाव गण, दि.23 रोजी वाकसई गण, दि.24 रोजी महागाव गण व दि.25, रोजी चांदखेड गण या पद्धतीने राबविण्यात येणार आहे.

कार्यकर्ते व जनतेचा रेटाच ठरवेल आमदारकीचा उमेदवार !
आगामी विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीसंदर्भात पत्रकारांनी विचारले असता, कार्यकर्त्यांचा व जनतेचा रेटाच विधानसभेचा उमेदवार ठरवेल व भाजपा कार्यकर्ता जिंकण्यासाठी लढतो असाही विश्वास व्यक्त केला; तसेच राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनाच दिल्लीतून उमेदवारी मिळाली तर या प्रश्नावर बोलताना निवडणुकीत आयाराम – गयारामांना संधी नाही, असाही ठराव पक्षाने घेतला असल्याचे स्पष्ट केले.

कान्हे रेल्वे उड्डाण पुलाबाबत आरोपांचे केले खंडन !
कान्हे येथील प्रस्तावित रेल्वे उड्डाण पूल रद्द करण्याची मागणी भाजपकडून केली जात असल्याचा आरोप आमदार सुनील शेळके यांनी केला होता. यासंदर्भात बोलताना तालुकाध्यक्ष भेगडे यांनी या आरोपांचे खंडन करून या पुलामुळे 171 रहिवाशी बाधित होत असल्याने तो स्थलांतरित करावा, अशी मागणी केली असल्याचा खुलासा भेगडे यांच्यासह देवराम सातकर, भगवान सातकर यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news