पिंपरी : एच 3 एन 2 आजाराच्या रुग्णांबाबत संदिग्धता | पुढारी

पिंपरी : एच 3 एन 2 आजाराच्या रुग्णांबाबत संदिग्धता

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : शहरामध्ये एच 3 एन 2 सदृश आजाराची साथ पाहण्यास मिळत आहे. महापालिका व खासगी रुग्णालयांमध्ये दररोज उपचारासाठी येणार्‍या रुग्णांमध्ये सर्दी, खोकला आणि ताप असणार्‍या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. तरीही ते एच 3 एन 2 या आजाराचे रुग्ण असल्याचे ठोसपणे म्हणता येणार नसल्याचे महापालिका वैद्यकीय विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

याबाबत महापालिकेकडून तूर्तास तरी तपासणी केली जात नसल्याचे चित्र समोर येत आहे. दरम्यान, एच 3 एन 2 या आजाराचे रुग्ण आढळल्याची अद्याप महापालिका प्रशासनाकडे नोंद नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.

सर्दी, खोकल्याने त्रस्त रुग्णांची संख्या वाढली
शहरातील महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये सध्या सर्दी, खोकला यांचे रुग्ण वाढले आहे. तापाच्या रुग्णांचे प्रमाण तुलनेत कमी आहे. महापालिका व खासगी रुग्णालयांत याबाबत प्रत्यक्ष पाहणी केली. महापालिका रुग्णालयांमध्ये सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण रांगा लावून उपचार घेत आहेत. तर, खासगी रुग्णालयांमध्ये नाव नोंदणी करून उपचार सुरू आहेत.

आजाराची लक्षणे काय?
डब्ल्यूएचओनुसार एच 3 एन 2 हा एनफ्लुएंझा ए चा उपप्रकार आहे. एच 3 एन 2 च्या संसर्गात आलेल्या रुग्णांना श्वास घेण्यात अडचण येते. त्याचप्रमाणे, सर्दी-खोकला, ताप, अंगदुखी, हगवण, उलटी अशी लक्षणेही आढळतात.

काय काळजी घ्याल?

  • गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करा.
  • साबण व पाण्याने हात वारंवार स्वच्छ धुवा.
  • खोकताना व शिकताना हातरुमाल व कपड्याने तोंड झाकून घ्या.
  • पौष्टिक आहार घ्या. तसेच, भरपूर पाणी प्या.
  • आहारात लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्यांचा वापर वाढवा.
  • पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी.
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये.
  • हस्तांदोलन टाळावे.

Back to top button