पिंपरी : संपामुळे पालिका कामकाजावर परिणाम : नागरिकांची गैरसोय | पुढारी

पिंपरी : संपामुळे पालिका कामकाजावर परिणाम : नागरिकांची गैरसोय

पिंपरी : जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपात पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचारी सहभागी झाले आहेत. बुधवारी (दि. 15) सलग दुसर्‍या दिवशी हा संप सुरू होता. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता अन्य विभागातील कर्मचार्‍यांनी संपात सहभाग घेतल्यामुळे पिंपरी महापालिका भवनात शुकशुकाट पाहण्यास मिळाला. तसेच, कामानिमित्त महापालिकेत येणार्‍या नागरिकांना माघारी परतावे लागत होते.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर आयुक्त शेखर सिंह यांनी एका परिपत्रकाद्वारे जुनी पेन्शन योजना लागू असलेल्या कर्मचार्‍यांना तात्काळ कामावर हजर राहण्याचे आदेश बजावले आहेत. तसेच, संबंधित अधिकारी व कर्मचारी कामावर हजर न झाल्यास त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. महापालिकेत सध्या एकूण 7012 कर्मचारी आहेत. त्यापैकी 3 हजार 996 कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. तर, 2 हजार 480 कर्मचारी संपात सहभागी झालेले नाहीत. 536 कर्मचार्‍यांनी रजा/साप्ताहिक सुटी घेतलेली आहे. वैद्यकीय, साफसफाई, सुरक्षा कर्मचारी आदी विभागांमध्ये कामाच्या आवश्यकतेनुसार साप्ताहिक सुट्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

महापालिकेत एकूण कार्यरत असलेल्या 7012 कर्मचार्‍यांमध्ये नव्या पेन्शन योजनेत 3 हजार 152 कर्मचारी कार्यरत आहेत. तर, जुन्या पेन्शन योजनेत 3 हजार 860 कर्मचारी आहेत. सध्या सुरू असलेल्या संपात जुनी पेन्शन योजना लागू असणारे कर्मचारीदेखील सहभागी झाल्याने आयुक्तांनी महापालिका भवनात विभागप्रमुखांची बैठक घेतली. तसेच, ज्या कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू आहे त्यांना कामावर हजर होण्याचे आदेश बजावले.

…तर कारवाईला सामोरे जा
महापालिकेचे जे अधिकारी व कर्मचारी 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी महापालिका सेवेत रुजू झाले आहेत. त्यांना जुनी पेन्शन योजना लागू आहे. अशा अधिकारी व कर्मचार्‍यांनी तात्काळ कामावर रुजू व्हावे. तशा लेखी सूचना विभागप्रमुखांनी संबंधित कर्मचार्‍यांना द्याव्यात. या आदेशाचे उल्लंघन करणारे अधिकारी व कर्मचारी हे महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 मधील नियम क्रमांक 6 चा भंग केल्याने शिस्तभंग कारवाईस पात्र राहतील, अशी समज आयुक्तांनी संबंधितांना दिली आहे.

रुग्णालयांची सेवा सुरळीत
शहरातील महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कर्मचार्‍यांच्या संपाचा विशेष परिणाम जाणवला नाही. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवा सुरळीत सुरू होती, अशी माहिती सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दैनिक ‘पुढारी’ला दिली. महापालिकेच्या पिंपरी-संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रुग्णसेवेवरदेखील संपाचा परिणाम झाला नसल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी स्पष्ट केले.

जुनी पेन्शन योजना लागू असणारे अधिकारी व कर्मचार्‍यांना तात्काळ कामावर हजर राहण्याचे आदेश आयुक्तांनी बजावले आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना वैद्यकीय कारणाशिवाय अन्य रजा रद्द करण्यास सांगितले आहे. महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेवर या संपाचा परिणाम झालेला नाही. ही सेवा सुरळीत सुरू आहे.

                                              – विठ्ठल जोशी, उपायुक्त, महापालिका.

कर्मचार्‍यांचा सुरू असलेला संप हा केवळ जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी नाही. कर्मचार्‍यांच्या एकूण 26 मागण्यांसाठी संप सुरू आहे. त्यामुळे या संपात सर्व कर्मचारी सहभागी झाले आहेत.

– बबन झिंजुर्डे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघ.

Back to top button