पुणे : 'होम ग्राऊंड’च्या संकल्पनेने ’एमसीए’चा महसूल बुडाला ; आयपीएलचा एकही सामना पुण्यात नाही | पुढारी

पुणे : 'होम ग्राऊंड’च्या संकल्पनेने ’एमसीए’चा महसूल बुडाला ; आयपीएलचा एकही सामना पुण्यात नाही

पुणे : गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए)च्या मैदानावर यावर्षी आयपीएलचा एकही सामना रंगणार नसल्याने क्रिकेटप्रेमी नाराज झाले आहेत. दरम्यान, एमसीएच्या मैदानावर आयपीएलचा सामना झाल्यास बीसीसीआय प्रत्येक सामन्याला 30 लाख रुपयांचा निधी देत असते. तोही या वर्षी एमसीएला मिळणार नसल्याने महसूल बुडणार आहे. गहुंजे येथील स्टेडियमवर 2022 मध्ये आयपीएलचे 15 सामने, तर महिलांच्या आयपीएलचे 4 सामने रंगले होते. प्रत्येक सामन्याला बीसीसीआय कडून एमसीएला 30 लाख रुपयांचा महसूल मिळत असतो.

गेल्यावर्षी आयपीएलच्या माध्यमातून साधारणतः 5 कोटी 70 लाख रुपयांचा निधी मिळाला होता. या निधीमधून खर्च ही त्याप्रमाणात होत असतो. पार्किंग, सेक्युरिटी, साफसफाई कर्मचारी आणि इतर खर्च या महसुलातून केला जातो. परंतु, यावर्षी महिला अथवा पुरुषांच्या आयपीएल स्पर्धेचा एकही सामना नसल्याने हा निधी मिळणार नाही. प्रत्येक वर्षी साधारणतः 10 आयपीएलचे सामने या स्टेडियमवर खेळविले जातात.

आयपीएलमध्ये खेळणार्‍या प्रत्येक संघातील मालकांनी त्यांच्या होम ग्राऊंडवर सामने खेळविण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातून संघ नसल्याने एमसीएला आयपीएलचे सामने मिळालेले नाहीत. बीसीसीआय स्टेडियमला सामने देण्याबाबतचा निर्णय घेत असते. आतापर्यंत प्रत्येक सामन्याला 30 लाख रुपयांचा महसूल मिळालेला असला, तरी खर्चही त्यापटीनेच होत असतो.
                        – सुभेंद्र भंडारकर, सचिव, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन.

Back to top button