पिंपरी : शहरातून दररोज आठ ते नऊ जण बेपत्ता | पुढारी

पिंपरी : शहरातून दररोज आठ ते नऊ जण बेपत्ता

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातून दररोज सरासरी आठ ते नऊजण बेपत्ता होण्याच्या घटना घडत आहेत. दरम्यान, पोलिस आयुक्तांनी बेपत्ता व्यक्ती शोधण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. मात्र, तरीही त्यांचा मिळून (शोध) येणार्‍यांची संख्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे शहरातील बेपत्ता ही एक पोलिसांसमोरची मोठी डोकेदुखी ठरत आहे.

वृद्धापकाळामुळे स्मृतिभ्रंश
वृद्धापकाळामुळे काहींना स्मृतिभ्रंशाची समस्या उद्भवते. ज्यामुळे नागरिकांचे स्वतःवर नियंत्रण राहत नाही. वृद्ध अचानक घराबाहेर पडतात. पुन्हा माघारी येण्यासाठी घर न सापडल्याने ते बेपत्ता होतात. रावेत पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक वृद्ध दळण आणण्यासाठी घराबाहेर पडले. त्यानंतर घर न सापडल्याने ते बेपत्ता झाले. पोलिसांनी शोध घेतल्यामुळे ही बाब सामोर आली.

सैराट होणार्‍यांचीही संख्या अधिक
अल्पवयीन वयात जोडीदारासोबत पळून जाणार्‍यांची संख्याही मोठी आहे. यामध्ये विवाहित महिलादेखील आहेत. याव्यतिरिक्त महिला वेगवेगळ्या कारणांसाठी कुटुंब सोडून निघून जातात. यावर्षी जानेवारी महिन्यात 260 तर फेब्रुवारी महिन्यात 257 जण बेपत्ता झाल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे.

पोटनिवडणुकीमुळे विशेष मोहीम बारगळली
पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी बेपत्ता व्यक्ती शोधण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले. यामध्ये सर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीत 1 ते 8 मार्च या कालावधीत मिसिंग व्यक्ती, महिला, पुरुष, मुले, मुलींचा शोध घेण्याचे नमूद होते. यासाठी सर्व प्रभारी अधिकार्‍यांनी पोलिस ठाणे स्तरावर मिसिंग स्कॉडदेखील नेमले. मात्र, दरम्यान चिंचवड पोटनिवडणुकीची धामधूम सुरू झाल्याने ही विशेष मोहीम बारगळली. त्यानंतर पुन्हा मुदतवाढ देऊन मोहीम सुरू करण्यात आली.

सततच्या बंदोबस्तामुळे पोलिस हैराण
पिंपरी- चिंचवड शहरात सतत व्हीआयपी व्यक्तींचे दौरे असतात. त्यामुळे पोलिसांना हातातील काम सोडून बंदोबस्ताकामी हजर राहावे लागते. सततच्या बंदोबस्तामुळे पोलिस हैराण झाल्याचे चित्र आहे.

मुलांचा परस्पर ताबा
नवरा- बायकोचे भांडण झाल्यानंतर मुलांचा परस्पर ताबा घेतला जातो. त्यानंतर पालक मिसिंग नोंदवतात. मात्र, न्यायालयाच्या आदेशानुसार अल्पवयीन मुल बेपत्ता झाल्यानंतर गुन्हा दाखल करणे बंधनकारक आहे. त्यानुसार, पोलिस गुन्हे दाखल करीत असल्याने अपहरणाच्या गुन्ह्यांचा आकडा वाढल्याचे दिसून येते.

Back to top button