पुणे : कोंढावळे बुद्रुकला आगीत घर भस्मसात

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : वेल्हेजवळील कोंढावळे बुद्रुक (ता. वेल्हे) येथे लागलेल्या भीषण आगीत शिवाजी ऊर्फ रावजी बजरंग भुरुक यांचे घर जळून भस्मसात झाले. आगीत प्रापंचिक वस्तू, ऐवज, चारा, अन्नधान्यासह सहा लाख रुपयांचे नुकसान झाले. विजेच्या शार्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. शिवाजी भुरुक व त्यांच्या पत्नी शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. तर मुलगा, सून आणि नातवंडे बाहेरगावी आहेत. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. ही दुर्घटना मंगळवारी (दि. 14) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. अचानक आग लागून आगीने रौद्र रूप धारण केले. घरातून बाहेर पडणारे आगीचे लोट दूर अंतरावरून दिसत होते. शेतातील काम सोडून शिवाजी भुरुक व त्यांच्या पत्नीने धाव घेतली. आग नियंत्रणात आणण्यासाठी पुष्कर वैद्य, तानाजी खोपडे, सचिन खोपडे, तानाजी भुरुक, विजय भुरुक, रमेश भुरुक, विजय थोपटे, कुमार भुरुक, राहुल रेणुसे, गणपत देवगिरकर आदींनी मिळेल तेथून पाणी आणून शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, तासाभरात भीषण आगीत सर्व साहित्य, रोख रकमेसह घर जळून खाक झाले.
सरकारी कर्मचार्यांच्या संपामुळे घटनास्थळी अधिकारी व कर्मचारी आले नाहीत. बुधवारी (दि. 15) सकाळी तलाठी बी. डी. शिंदे यांनी नुकसानीचा पंचनामा केला. आगग्रस्त कुटुंबाला घर बांधण्यासाठी आवश्यक मदत देण्यात यावी, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद देशमाने यांनी केली आहे.देशमाने तसेच शुभम बेलदरे, प्रवीण खोपडे, नानासाहेब साबणे, विठ्ठल गोरे आदींनी आगग्रस्त कुटुंबाची भेट घेतली. पोलिस पाटील सुनील भुरुक, स्वप्निल भुरुक आदी उपस्थित होते.