पुणे : थिटेवाडीच्या पाण्यावरून केंदूर, पाबळकरांमध्ये संघर्ष | पुढारी

पुणे : थिटेवाडीच्या पाण्यावरून केंदूर, पाबळकरांमध्ये संघर्ष

शिक्रापूर : पुढारी वृत्तसेवा :  उन्हाळ्याला सुरुवात होताच थिटेवाडी (ता. शिरूर) धरणातील पाण्यावरून केंदूर व पाबळमधील शेतकर्‍यांमध्ये संघर्ष सुरू होतो. याही वर्षी केंदूर गावासाठी धरणातून पाणी सोडण्याबाबत तसेच पाबळमध्ये शिल्लक साठ्यातून पाणी उपसा करण्याबाबत शेतकर्‍यांमध्ये वाद सुरू झाल्याने आता पाबळ व केंदूर येथील शेतकर्‍यांमध्ये संघर्ष उभा राहिला आहे. केंदूर गावचे सरपंच सूर्यकांत थिटे व उपसरपंच विठ्ठल ताथवडे यांनी नदी व कालव्याद्वारे केंदूरला पिण्याचे पाणी सोडावे याबाबत ठाम भूमिका घेतल्याने हे नेते केंदूरकरांसाठी लढत असल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

उन्हाळ्यामध्ये वेळ नदीवर असलेले केटी बंधारे भरले जावेत, अशी भूमिका केंदूरच्या शेतकर्‍यांची आहे. या उलट पाबळ येथील शेतकर्‍यांची भूमिका मांडण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याने पाबळ येथील शेतकरी वर्ग सरपंच, उपसरपंच व गावनेत्यांवर नाराज असल्याचे चित्र आहे. केंदूरचे सरपंच सूर्यकांत थिटे यांनी उन्हाळी आवर्तन मिळावे यासाठी जलसंपदा खात्याकडे पाठपुरावा केला आहे. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या बेकायदेशीर पाणी उपशाचा प्रश्न उपस्थित झाला असून, त्याला प्रतिबंध करण्यासाठी पाटबंधारे विभाग व महावितरणने कार्यवाही सुरू केली आहे. पाणी प्रश्नावरून केंदूर व पाबळमधील शेतकर्‍यांमध्ये सामंजस्य राहावे यासाठी सकारात्मक भूमिका घेऊ, असे सरपंच थिटे यांनी सांगितले.

दुसरीकडे पाबळ येथील शेतकरी योगेश चौधरी यांनी पाबळमधील शेतकर्‍यांच्या पाणी समस्येसाठी कुणीही पुढे येत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. थिटेवाडी धरणासाठी पाबळकरांनी आंदोलन केले असून, या धरणासाठी पावळच्या शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित झालेल्या आहेत, यामुळे पाबळच्या शेतकर्‍यांना पाणी मिळाले पाहिजे. केंदूर व पाबळ असा प्रादेशिक वाद न घालता थिटेवाडी धरणामध्ये कायमस्वरुपी कळमोडी अथवा चासकमान किवा डिंभे धरणातून पाणी उपलब्ध होईल, यासाठी येथील नेत्यांनी लढले पाहिजे, असे सांगितले.

Back to top button