पुणे : दिव्यांग कलाकारांच्या धाडसाला प्रोत्साहन द्या ; ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले यांचे आवाहन | पुढारी

पुणे : दिव्यांग कलाकारांच्या धाडसाला प्रोत्साहन द्या ; ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले यांचे आवाहन

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  दिव्यांग कलाकारही सामान्य कलाकारांप्रमाणेच आहेत. आज रंगमंचावर येऊन ते आपली कला सादर करीत आहेत. कलाकारांनी स्पर्धा जिंकली नाही, तरी चालते; परंतु रंगमंचावर येऊन कला सादर करणे यालासुद्धा धाडस लागते. या दिव्यांग कलाकारांमध्ये हे धाडस असून, त्यांच्या या धाडसाला आपण प्रोत्साहित केले पाहिजे, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले यांनी बुधवारी केले. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित चौथ्या राज्य दिव्यांग बालनाट्य स्पर्धेच्या पुणे केंद्रावरील अंतिम फेरीला बुधवारी सुरुवात झाली. स्पर्धेचे उद्घाटन गोडबोले यांच्या हस्ते झाले.

संकेत देशपांडे, डॉ. प्राजक्ता कोळपकर, परीक्षक मंगेश दिवाणजी, वैशाली गोस्वामी, गिरीश भूतकर, संचालनालयाच्या सहायक संचालिका सुनीता असावले या वेळी उपस्थित होते. अंतिम फेरीला यमुनाई शैक्षणिक आणि सांस्कृतिक महिला मंडळाच्या (धुळे) ‘विधी’ या बालनाट्याने सुरुवात झाली. त्यानंतर ‘जत्रा’, ‘दगडी भूत’, ‘शाला’ या बालनाट्यांचे सादरीकरण झाले. दिव्यांग कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. शुक्रवारपर्यंत (दि. 17) स्पर्धेची अंतिम फेरी घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे होत आहे. गुरुवारी (दि. 16) ‘रिले’, ‘अरे माणसा माणसा’, ‘वनराई’, ‘चला धडा शिकवूया’, ‘आजोबा’ आणि ‘लाल टी-शर्ट’, ‘देवा तुझे किती सुंदर आकाश’ ही बालनाट्ये; तर शुक्रवारी (दि. 17) ‘कोरडा गाभारा’, ‘वारी’, ‘गोदा’ आणि ‘आम्ही सारे’ ही बालनाट्ये विनामूल्य पाहायला मिळतील.

Back to top button