पुणे : झेडपी कर्मचार्‍यांची प्रवेशद्वारावर निदर्शने | पुढारी

पुणे : झेडपी कर्मचार्‍यांची प्रवेशद्वारावर निदर्शने

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पुणे जिल्हा परिषदेसमोर कर्मचार्‍यांनी दुसर्‍या दिवशीही जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, या मागणीसाठी पुकारलेल्या बंदला प्रतिसाद दिला. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयासमोर निदर्शने करत कामकाज बंद ठेवले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी (दि. 17) मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद पुणे सर्व घटक संघटना समन्वय समितीकडून सांगण्यात आले. बंदमुळे जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या कामकाजावर परिणाम झाला आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या दालनातील कामकाज सांभाळण्यासाठी ’कमवा आणि शिका’ योजनेतील विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येत आहे. कर्मचार्‍यांच्या संपामुळे जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची गैरसोय झाली. प्रवेशद्वाराजवळ कर्मचार्‍यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच, कर्मचार्‍यांनी एकजूट दाखवत शासनाला जुनी पेन्शन योजना देण्यास भाग पाडू, असा पवित्रा घेतला. सध्या मार्च महिना सुरू असल्याने जिल्हा परिषदेतील सर्वच विभागात कामांची लगबग असते. मात्र, असे असताना सर्वच काम बंद असल्याने कामकाजावर परिणाम झाला. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयासमोर जिल्ह्यातील पंचायत समित्यांसह विविध संघटनांचे कर्मचारी सहभागी झाले होते.

Back to top button