पुणे : ससूनमध्ये रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ | पुढारी

पुणे : ससूनमध्ये रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ

पुणे : पुढारी वृत्तसेवा : वॉर्डामधील अस्वच्छता, जेवणाच्या बदललेल्या वेळा, रुग्णांना स्ट्रेचरवरून घेऊन जाण्याची नातेवाइकांवर आलेली वेळ, अशी परिस्थिती ससून रुग्णालयात पाहायला मिळाली. संपामुळे रुग्णसेवा विस्कळीत झाली असली, तरी 500 निवासी डॉक्टर, नर्सिंग कॉलेजचे 200 विद्यार्थी यांनी कामाची धुरा सांभाळली. याशिवाय चतुर्थ श्रेणीचे 60 टक्के कर्मचारी कामावर रुजू झाले. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी रुग्णसेवेची घडी बसल्याचे निदर्शनास आले.

तरीही वेळेवर सलाइन बदलले न जाणे, रुग्णांना स्वच्छतागृहात घेऊन जाणे, औषधे मिळण्याबाबत दिरंगाई झाल्याचे रुग्णांच्या नातेवाइकांनी ’पुढारी’शी बोलताना सांगितले. दररोज होणार्‍या मोठ्या शस्त्रक्रियांचे प्रमाण 80 वरून 30 वर आणि छोट्या शस्त्रक्रियांचे प्रमाण 40 वरून 9 पर्यंत कमी झाले.

ससून रुग्णालयात दाखल रुग्णांच्या सेवा, तपासण्या, शस्त्रक्रिया सुरळीत सुरू राहाव्यात, यासाठी खासगी एजन्सीकडून 100 कर्मचारी आणि 100 परिचारिका यांना तातडीने रुजू करून घेण्याचा निर्णय अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी घेतला आहे. मनुष्यबळ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

संपामुळे रुग्णांची हेळसांड होऊ नये, यासाठी खासगी एजन्सीशी बोलणे झाले आहे. एजन्सीमार्फत 100 कर्मचारी आणि 100 परिचारिका गुरुवारपासून रुजू करून घेतल्या जातील. त्यांना एक महिन्याचे वेतन दिले जाईल.
                                      – डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, ससून रुग्णालय

दृष्टिक्षेपात रुग्णसेवा
(15 मार्च) :
बाह्य रुग्ण विभाग – 1650
आंतररुग्ण विभागातील नवीन भरती – 1200
एकूण भरती – 1700
मोठ्या शस्त्रक्रिया – 9
छोट्या शस्त्रक्रिया – 30

Back to top button