पुणे : पीएमपी चालकाच्या डोक्यात घातला दगड ; भाजपच्या माजी नगरसेविकेसह चौघांवर गुन्हा दाखल | पुढारी

पुणे : पीएमपी चालकाच्या डोक्यात घातला दगड ; भाजपच्या माजी नगरसेविकेसह चौघांवर गुन्हा दाखल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पीएमपी चालक आणि एका कारचालकाचा बुधवारी पूरम चौकात किरकोळ अपघात झाला. यामुळे कारचालकाने पीएमपी चालकाच्या डोक्यात दगड घातला. या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात भाजपच्या माजी नगरसेविकेसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएमपीचे चालक शशांक देशमाने (वय 52, रा. बालाजीनगर, धनकवडी) हे सकाळी पीएमपीच्या बसवर कार्यरत होते. सकाळी 8.45 वाजता बस पूरम चौकात आली. त्या वेळी कारला बसचा मागून धक्का लागला. यामुळे कारमधील 4 जणांनी पीएमपी चालकाशी वाद घातला. चालकाच्या डोक्यात दगड घातला. या प्रकरणी माजी नगरसेविका प्रतिभा ढमाले, मुकेश पायगुडे, महेश भरगुडे अन्य एक अशा चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पीएमपीचे चालक शशांक यादवराव देशमाने यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशमाने हे स्वारगेट डेपोमध्ये कार्यरत आहेत. सकाळी ते स्वारगेट येथून बाजीराव रस्त्याने शनिवारवाड्याच्या दिशेने बस घेऊन जात होते. या वेळी ते अभिनव कॉलेज चौकात आले असता, त्यांच्यापुढे असलेल्या चारचाकी वाहनाला पाठीमागून धक्का बसला. या वेळी चारचाकीमध्ये माजी नगरसेविका प्रतिभा ढमाले, पायगुडे आणि अन्य दोघे असे चौघे जण होते. त्यांनी खाली उतरून चालकाशी वाद घालून मारहाण करण्यास सुरुवात केली. यातील एकाने रस्त्यावरील सिमेंटचा ब्लॉक उचलून चालकाच्या डोक्यात घातला. यात चालक जखमी झाला. देशमाने यांना तत्काळ ससून रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. सायंकाळी त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दरम्यान, ढमाले यांनीदेखील तक्रार दिली असून, चालकाने आपल्याशी हुज्जत घातल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Back to top button