पुणे बाजार समिती निवडणुकीचे पडघम | पुढारी

पुणे बाजार समिती निवडणुकीचे पडघम

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची अंतिम मतदार यादी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक (ग्रामीण) प्रकाश जगताप यांनी बुधवारी (दि. 15) प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे 19 वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर या बाजार समितीच्या निवडणुकीचे धुमशान लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. बाजार समितीसाठी 18 संचालकांच्या निवडणुकीसाठी 17 हजार 746 इतके मतदार आहेत. त्यामध्ये सर्वाधिक मतदार अडते-व्यापारी मतदारसंघात असून, ते 13 हजार 174 इतके आहे. अडते-व्यापारी मतदारसंघातून दोन संचालक बाजार समितीवर निवडून दिले जातात. मात्र, एकूण मतदारांच्या 74 टक्के मतदार हे याच मतदारसंघात असल्याने सर्वाधिक चुरशीची निवडणूक याच मतदारसंघात होण्याची चिन्हे आहेत.

राष्ट्रवादी पुरस्कृत एकच पॅनल करा : पवार
हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणुकीत पक्षाचे अनेक जण इच्छुक असल्याने अजित पवार यांच्याशी बुधवारी मुंबईत चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत एकच पॅनेल करण्याची सूचना अजित पवार यांनी केली आहे. आमदार अशोक पवार, चेतन तुपे, सुनील टिंगरे, संजय जगताप, तसेच प्रमुख पदाधिकारी यांची एकत्रित बैठक शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता पुणे येथे होणार आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी ही बैठक आयोजित केली आहे. सर्वांना विश्वासात घेऊन या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत एकच पॅनल करावा, अशा पद्धतीच्या चर्चा करण्यात येणार आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या मान्यतेने बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल.
                                        – प्रकाश जगताप, जिल्हा उपनिबंधक (ग्रामीण), पुणे

क्र. मतदारसंघ संचालकसंख्या मतदारसंख्या
1 विकास सोसायटी 11 संचालक 1852
2 ग्रामपंचायत मतदारसंघ 4 संचालक 713
3 अडते-व्यापारी मतदारसंघ 2 संचालक 13,174
4. हमाल-तोलणार मतदारसंघ 1 संचालक 2007
एकूण 18 संचालक 17,746

Back to top button