

पुणे, पुढारी वृत्तसेवा: गतीमंद मुलीवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणात विशेष न्यायाधीश एस. बी. साळुंखे यांनी एका वृध्दाला 15 वर्षे सक्तमजुरी आणि 20 हजारांचा दंड सुनावला आहे. गुन्हा दाखल असलेल्या एका आरोपीचा डीएनए आणि पिडीत मुलीची इंटरपिटर डॉक्टरद्वारे नोंदवलेली साक्ष खटल्यात महत्वाची ठरली. बाळासाहेब गोविंद देवडे (73, रा. लोणी काळभोर) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. खटल्यात विशेष सरकारी वकील विलास पटारे आणि विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी काम पाहिले.
पिडीत मुलगी ही 35 वर्षाची व गतीमंद असल्याचे माहिती असताना आरोपी व त्याच्या साथीदारांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या प्रकरणात चार जणांना आरोपी करण्यात आले होते. या प्रकरणात खटला चालला असता बाळासाहेब गोविंद देवडे याने तिच्यावर अत्याचार केल्याचे डीएनएच्या वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले. तसेच पिडीत मुलीच्या साक्षीच्या स्पष्टीकरणासाठी ससूनच्या डॉक्टरांना बोलवून तिची साक्ष इशार्यांवरून नोंद करण्यात आली. तसेच ती काय बोलत आहे हे न्यायाधीशांना विस्तृत करून सांगितले गेले. न्यायालयातील हे दोन मुद्दे महत्वाचे ठरले. त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकील विलास पटारे यांनी केली. न्यायालयाने वयोवृध्द आरोपीला ही पंधरा वर्षाची शिक्षा सुनावली. गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक सुवर्णा हुलवान यांनी केला. तर लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. एल. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार ललिता कानवडे, पोलिस नाईक संतोष सोनावणे, पोलिस शिपाई संदीप धुमाळ यांनी महत्वाची कामगिरी बजावली. पुराव्या अभावी इतर तीन आरोपींची खटल्यातून मुक्तता करण्यात आली.