पुण्यात कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे आरटीओतील कामकाज ठप्प | पुढारी

पुण्यात कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे आरटीओतील कामकाज ठप्प

पुणे, पुढारी वृत्तसेवा: सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे आरटीओ कार्यालयातील कामकाज ठप्प झाले असून, नागरिकांचे हाल होत आहेत. दरम्यान, कच्चा परवाना ही सेवा ऑनलाइन असलयामुळे नागरिकांना घरबसल्या कच्चा परवाना काढता येत आहे. आरटीओ कार्यालयात असलेले सर्व सरकारी कर्मचारी सध्या संपावर आहेत. त्यामुळे गेली दोन दिवस कार्यालयातील कामे थांबली असून नागरिकांचे हाल होत आहेत.

दरम्यान, आरटीओ कार्यालयात होणारी कॅशची काही कामे, दुय्यम अर्ज, हस्तांतरण, नूतनीकरण, खटला विभागातील कामे, परवान्याचे कामकाज, लायसन्स विभागातील कामे, प्रशासकीय आस्थापना विषयी कामकाज, कार्यालयात होणारी काही वाहन नोंदणी, परराज्यातील वाहनांना एनओसी देणे ही कामे सध्या थांबलेली आहेत. त्यामुळे नागरिकांना आरटीओ कार्यालयात येऊन पुन्हा घरी जावे लागत आहे.

आरटीओतील संपावर असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी कार्यालय परिसरात ‘द्वार’ सभा घेतली. यावेळी सरकारी कर्मचारी संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष जगदीश कांदे, आरटीओ कर्मचारी संघटनेचे महेश घुले, जिल्हा मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे विभागीय सचिव प्रशांत पवार व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Back to top button