शिर्सुफळ : साईडपट्ट्या नसल्याने रस्ता बनला धोकादायक | पुढारी

शिर्सुफळ : साईडपट्ट्या नसल्याने रस्ता बनला धोकादायक

शिर्सुफळ (ता. बारामती); पुढारी वृत्तसेवा : गाडीखेल  गावातील अंतर्गत रस्ता 10 लाख रुपये खर्च करून सिमेंटचा करण्यात आला. या रस्त्याचे काम दोन वर्षांपूर्वी ठेकेदाराने केले होते; मात्र, या रस्त्याच्या साईडपट्ट्या तेव्हापासून भरलेल्या नाहीत. या ठिकाणी रस्ता उंच असल्याने वाहने घसरून अपघात होत आहेत. तसेच हा रस्ता निकृष्ट झाला असून, याची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या रस्त्यावरून एकाच वेळी दोन वाहने आल्यास वाहनचालकांची तारांबळ उडते.

साईडपट्टी नसल्यामुळे वाहन खालीही घेता येत नाही. रात्रीच्या वेळी दुचाकी वाहने रस्त्यावरून घसरत आहेत. या ठेकेदाराला काळ्या यादीत समाविष्ट करावे, अशी समस्त ग्रामस्थांची मागणी आहे. यामध्ये अधिकारी व ठेकेदारांचे लागेबंधे असल्याचे चित्र दिसत आहे. रस्त्याचे काम होऊन दोन वर्षे झाले असले तरी हा रस्ता गैरसोयीचा ठरत आहे. 2 वर्ष झाले आहेत; परंतु अजून या ठिकाणी ठेकेदाराने साईडपट्ट्यांवर मुरूम टाकलेला नाही. परिणामी, या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता आहे.

विरोधी पक्ष नेते अजित पवार हे गावांसाठी भरभरून निधी देत आहेत; परंतु असे ठेकेदार व अधिकारी या निधीचा दुरुपयोग करीत आहेत. या ठिकाणी रस्त्याचे काम होऊन दोन वर्षे पूर्ण झालेली आहेत, परंतु अजूनही या ठिकाणी साईडपट्टीवर ठेकेदाराने मुरूम टाकलेला नाही. यामध्ये अधिकारी व ठेकेदार यांच्यामध्ये लागेबांधे असल्याचे दिसत आहे. या ठेकेदार व अधिकार्‍यांवर कडक कारवाई करण्यात यावी.

                          शरद शेंडे, उपसरपंच, गाडीखेल

रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर मुरुमाने साईडपट्ट्या भरल्या होत्या; परंतु पावसाने साईडपट्या वाहून गेल्या आहेत.

 उदय नांदखिले, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग बारामती

Back to top button