भोर शहरात आजपासून ‘पे अँड पार्क’ | पुढारी

भोर शहरात आजपासून ‘पे अँड पार्क’

भोर; पुढारी वृत्तसेवा : भोर शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासह उत्पन्नवाढीसाठी नगरपरिषदेने पहिल्या टप्प्यात काही भागांत ’पे अँड पार्क’ योजना हाती घेतली आहे. या भागात यापुढे नागरिकांना मोटारसायकल, मोटारी, जीप व बसच्या पार्किंगसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. बुधवार (दि. 15) पासून त्याची अंमलबजावणी होणार असल्याचे फलक चौकाचौकांत भोर नगरपालिकेने लावले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील वाहतूक कोंडीने पुन्हा डोके वर काढले आहे. एस. टी. बसस्थानक ते राजवाडा चौक, बजरंग आळी ते पोलिस चौकी, काळा गणपती चौपटी या भागांत अतिक्रमण आणि वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे.

याशिवाय शहरातील गणेश पेठ, आमराई आळी, भोई आळी परिसरात मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर वाहने उभी केल्याचे पाहणीत आढळले आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ऑगस्ट 2022 मधील सर्वसाधारण सभेत बहुमताने ठराव मंजूर करून नगरपरिषद हद्दीतील बसस्थानक ते राजवाडा, पंचायत समिती परिसर, स्मशानभूमी येथे ’पे अँड पार्क’ व्यवस्था केली असून, त्याचा ठेका एका एजन्सीला नगरपालिकेने दिला आहे.

नो पार्किंग झोनमध्ये उभ्या केलेल्या वाहनांसाठी जादा दराची आकारणी होणार आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील गर्दीच्या ठरावीक भागांत ही योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी नगरपरिषदेने जानेवारी महिन्यात काळा गणपती मंदिर ते भोरेश्वर मंदिर, राजवाडा चौक, पंचायत समिती परिसरात ऑईलपेंटने पट्टे आखून वाहनांच्या हद्दी निश्चित करून शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. पार्किंगच्या परिसरात वाहनांसाठी हद्दनिश्चिती, आवश्यक ते सूचनाफलक, सुरक्षाव्यवस्था, वाहन उचलण्यासाठी क्रेन, मोठे वाहन आदींची तरतूद ठेकेदार कंपनीकडून केली जाणार आहे. भविष्यात हळूहळू शहराच्या उर्वरित भागांत ही योजना राबविण्यात येणार आहे.

पार्किंगच्या जागा
काळा गणपती चौक ते राजवाडा, राजवाडा ते भोरेश्वर मंदिर, राजवाडा ते पंचायत समिती, राजवाडा परिसर, स्मशानभूमी परिसर, मशालजीचा माळ ते एसटी बसस्थानक रस्ता, एसटी बसस्थानकासमोरील परिसर, निरा नदीवरील पुलाजवळच्या प्रवेश कमानीचा भाग.

पहिल्या टप्प्यात शहरातील काही भागांमध्ये ‘पे अँड पार्किंग’ची आजपासून ठेकेदारांकडून अंमलबजावणी होणार आहे.

                                               – हेमंत किरुळकर, मुख्याधिकारी, भोर नगरपालिका

Back to top button