नवी सांगवी : धूळखात पडलेल्या वाहनांवर कारवाई कधी? | पुढारी

नवी सांगवी : धूळखात पडलेल्या वाहनांवर कारवाई कधी?

नवी सांगवी : पिंपळे गुरव येथील कांकरिया गॅस गोडावून येथून राजीव गांधीनगरच्या दिशेने जाणार्‍या रस्त्याच्याकडेला पदपथाला लागून काही वाहने धूळखात पडून आहेत. त्यामुळे येथील परिसराला बाधा पोहोचत आहे. यासंदर्भात सांगवी वाहतूक विभागाला तक्रार करूनही नागरिकांना केराची टोपली दाखविण्यात येत आहे.

साफसफाई करण्यात अडचणी
पालिकेच्या स्मार्ट सिटीअंतर्गत लाखो रुपये खर्च करून रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण, पदपथ, चौक करण्यात आले आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून येथील रस्त्याच्याकडेला पदपथाला लागून भंगार अवस्थेतील बेवारस वाहने धूळखात पडून आहेत. त्यामुळे या वाहनांच्या अवतीभोवती पालापाचोळा, माती, प्लास्टिक बाटल्या आदी कचरा साचत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांनादेखील स्वच्छता करणे कठीण जात आहे.

याच ठिकाणी नुकतीच एका झाडाची वाळलेली फांदीदेखील खाली पडली होती. महापालिकेने पदपथाला लागून सीमाभिंत उभारली आहे. त्यावर हजारो रुपये खर्च करून संदेश देणारी चित्रे रेखाटून त्यावर आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीसारखा परिसर आणखी उजळून निघाला आहे. मात्र, रस्त्याच्याकडेला भंगार अवस्थेतील धूळखात पडलेल्या बेवारस वाहनांमुळे तसेच दिवसेंदिवस येथील परिसर अस्वच्छ होत असल्याने परिसराला बाधा पोहोचत आहे.

सकाळी फिरायला येणार्‍यास त्रास
व्यायाम करण्यासाठी आणि फेरफटका मारण्यासाठी नागरिक येथील पदपथावरून दररोज सकाळी व संध्याकाळी ये-जा करीत असतात. मात्र, अस्वच्छतेमुळे तसेच दुतर्फा बाजूस वाहने मोठ्या प्रमाणात पार्क केल्याने पदपथ सोडून रस्त्यावर उतरून जीव मुठीत धरून अनेकदा चालावे लागत आहे.

वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
अनेकदा भंगार अवस्थेतील तसेच धूळखात पडलेल्या बेवारस वाहनांवर कारवाई होत असते. मात्र, येथील वाहनांवर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न नागरिकांमध्ये भेडसावत आहे. येथील अस्वच्छतेमुळे भटकी कुत्री, जनावरे येऊन येथील कचरा रस्त्यावर पसरवीत आहेत. त्यामुळे संबंधित सांगवी वाहतूक पोलिसांनी येथील धूळखात पडलेल्या बेवारस वाहनांवर कारवाई करून येथील भंगार अवस्थेतील वाहने उचलावेत.

या ठिकाणची पाहणी करण्यात येणार आहे. संबंधित मालकांचा नाव, पत्ता शोधवा लागेल. जर बेवारस वाहने असतील, त्याची माहिती पोलिस ठाण्याला कळवून पंचनामा करावा लागणार आहे.

                      – प्रसाद गोकुळे, वरिष्ठ वाहतूक पोलिस निरीक्षक सांगवी

Back to top button