पिंपरी : आरटीई अर्ज भरण्यासाठी पालकांची लूट; एका अर्जासाठी 100 ते 500 रुपये | पुढारी

पिंपरी : आरटीई अर्ज भरण्यासाठी पालकांची लूट; एका अर्जासाठी 100 ते 500 रुपये

वर्षा कांबळे

पिंपरी :  सध्या आरटीई ऑनलाईन प्रवेश अर्जासाठी संकेतस्थळावर प्रवेशअर्ज भरण्याचे काम सुरू आहे. वेबसाईट हँग होणे आणि इतर तांत्रिक अडचणीमुळे आरटीई पालकांना अर्ज भरण्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. बहुतांश आरटीई पालक हे अल्पशिक्षित आणि इंटरनेटचे ज्ञान नसल्याने अर्ज भरण्यास असमर्थ आहेत. त्यामुळे आरटीई अर्ज भरून देणार्‍या केंद्रांचा शहरात सुळसुळाट झाला असून काही ठिकाणी अर्ज भरण्यासाठी पालकांकडून शंभर ते पाचशे रुपये उकळले जात आहेत.

तर काहीजण सामाजिक काम करण्याच्या नावाखाली आरटीई अर्ज भरून पैसे कमवित आहेत. थोडक्यात पालकांच्या अज्ञानपणाचा फायदा हा पैसे कमविण्यासाठी होत आहे. आपल्या पाल्यानेदेखील महायफायफ शाळेत शिकावे, अशी या गोरगरीब पालकांची इच्छा असते. 25 टक्के आरक्षणाचा फायदा त्यांना त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी होत असतो. त्यामुळे पालक कामधंदा सोडून पाल्याचा अर्ज भरण्यासाठी मागेल ती रक्कम देतात.

ऑनलाईनद्वारे अर्ज भरणे ठरते जिकिरीचे
अनेक पालकांकडे स्मार्ट फोन नसतो, किंवा स्मार्ट फोन असला तरी ज्ञान नसल्यामुळे ऑनलाईनची कामे करणे जिकिरीचे ठरते. पालक अर्ज भरण्यासाठी सायबर कॅफेमध्ये जातात. जो अर्ज मोफत भरून दिला जातो, त्यासाठी पैसे मोजावे लागतात.

मनपाच्या मदत केंद्रांत फक्त मार्गदर्शनच :
आरटीईसाठी मनपाने मदत केंद्रांची यादीदेखील जाहीर केली आहे. मात्र, पालकांना अर्ज भरताना फक्त मार्गदर्शन केले जाते. याठिकाणी अर्ज भरला जात नाही. तसेच काही सामाजिक कार्यकर्ते यांनीदेखील आरटीई अर्ज भरण्यासाठी केंद्र उघडली आहेत. महापालिकेने पालकांनी सायबर कॅफेकडे न जाता महापालिकेने दिलेल्या मदत केंद्रावर अर्ज भरावा, असे आवाहन केले आहे.

घटना
पालक : हॅलो, मला माझ्या मुलाचा आरटीईचा अर्ज भरायचा आहे. तुम्ही भरून देता का?
अर्ज भरून देणारी व्यक्ती : हो, पण तुम्हाला कोणी सांगितले.
पालक : तुमच्याकडेच एका पालकाने अर्ज भरला त्याने सांगितले.
अर्ज भरून देणारी व्यक्ती : ज्यांना अर्ज भरता येत नाही त्यांचा अर्ज भरून देतो.
पालक : मला पण अर्ज भरायचा आहे. किती रुपये लागतील.
अर्ज भरून देणारी व्यक्ती : एक अर्ज भरायला शंभर रुपये पडतील. 17 मार्चपर्यंत मुदत आहे. तेव्हा लवकर भरा.
पालक : हो ठीक आहे.

पालकांना आरटीई अर्ज भरण्याबाबत काही समस्या असल्यास मनपाची दहा आरटीई मदत केंद्र आहेत. याठिकाणी जाऊन पालकांनी मार्गदर्शन घ्यावे. सायबर कॅफेमधून किंवा इतर ठिकाणी पैसे भरून अर्ज भरू नयेत. मार्गदर्शन केंद्रांवर गरज पडली तर अर्जदेखील भरून दिला जाईल.
                                    – संजय नाईकडे, प्रशासन अधिकारी,
                                                   शिक्षण विभाग पिं.चि.

Back to top button