मंचर : ‘सोनू’ झालीय सोशल मीडियाची ‘स्टार’; 2 लाख 51 हजार रुपयांना खरेदी | पुढारी

मंचर : ‘सोनू’ झालीय सोशल मीडियाची ‘स्टार’; 2 लाख 51 हजार रुपयांना खरेदी

मंचर(ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील मंचर येथील आदर्श पशुपालक शेतकरी गणेश खानदेशे यांनी खरेदी केलेल्या डेन्मार्क जातीच्या ‘सोनू’ गाईची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. चाळीस लिटर दूध देणारी ही गाय 2 लाख 51 हजार रुपयांना खानदेशे यांनी खरेदी केली आहे. या गाईचे सध्या सोशल मीडियावर कौतुक सुरू असून, हजारोंनी या गाईचे फोटो, व्हिडीओ, व्हायरल होत असल्याने सोशल मीडियावर सोनू गाय स्टार झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथील प्रगतशील शेतकरी संजय सालगुडे पाटील यांच्याकडून खानदेशे यांनी ही गाय विकत घेतली आहे. खानदेशे हे पुणे डेरी फार्मस असोशिएशनचे समन्वयक आहेत. सोनू गाईचे वैशिष्ट्ये : वय पाच वर्षे, वजन साडेआठ क्विंटल, उंची सहा फूट, लांबी आठ फूट, तर दूध देण्याची क्षमता-चाळीस लिटर आहे. नाशिक, कोल्हापूर, पुणे, सांगली,सोलापूर, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, इत्यादी भागांतील शेतकरी ही गाय पाहण्यासाठी येत आहेत.

महाराष्ट्र शासनाने पंजाब राज्याप्रमाणे पशु धोरण राबवून जातीवंत दुधाळ गायींची पैदास करण्याकरिता वर्ल्ड वाईड ए-बी.एस, डेन्मार्क आदी जातींच्या चांगले रेकॉर्ड असलेले वळुंच्या वीर्यावर काम करणे गरजेचे आहे. राज्यातील दूध उत्पादकांना व्यवसायात येणार्‍या अडचणी वार्षिक कार्यशाळा प्रकल्प भेटींचे आयोजन करून सोडविल्या पाहिजेत. दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या जीवनात आर्थिक, सफलता, समृद्धी व सामाजिक प्रगती साधण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे.

                                            – आकाश थोरात, आकाश डेअरी फार्म, मंचर

Back to top button