सहा कारखान्यांना भीषण आग; धायरी येथील घटना | पुढारी

सहा कारखान्यांना भीषण आग; धायरी येथील घटना

धायरी/पुणे; पुढारी वृत्तसेवा : सिंहगड रस्ता परिसरातील धायरी भागात असलेल्या गणेशनगर गल्ली क्रमांक बी 22 येथे विविध प्रकारचे सहा कारखाने मंगळवारी सायंकाळी 7 वाजता आगीत भस्मसात झाले. यामध्ये 2 दुचाकी व 2 चारचाकी वाहने खाक झाली आहेत. वेळीच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणेशनगर परिसरात असलेल्या फर्निचर, वाहनदुरुस्ती, रंग स्प्रे बनविणे आदी कारखान्यांच्या आतील सिलिंडरचे तसेच केमिकल बॅरलचे आठ ते दहावेळा स्फोट होऊन प्रचंड मोठी आग लागली.

दरम्यान तत्काळ नवले, सिंहगड, पीएमआरडीए नांदेड सिटी, वारजे, भवानी पेठ इत्यादी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या जवानांनी दोन तासांच्या आत लागलेली भीषण आग शर्थीचे प्रयत्न करून आटोक्यात आणली. सिंहगड रस्ता पोलिस वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग वाघमारे व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी त्वरित धाव घेऊन बघ्यांच्या गर्दीला बाजूला करीत वाहतूक नियमन केले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आगीमुळे आकाशात धुराचे लोट पसरले होते. आगीची माहिती मिळताच परिसरात राहणार्‍या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर देखील घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आगीच्या या घटनेमुळे परिसरात काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, रात्री उशिरा आगीवर नियंत्रण मिळविल्यानंतर रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

वाढदिवशी देखील कर्तव्याला प्राधान्य
अग्निशमन दलाचे जवान गणेश ससाणे यांचा मंगळवारी जन्मदिवस होता. तरीसुद्धा वाढदिवस साजरा करण्याचे सोडून पहिल्यांदा कर्तव्य श्रेष्ठ, या हेतूने आपले कर्तव्य बजाविण्यासाठी पहिल्यांदा आपल्या युनिटसह पोहचले. जिवाची पर्वा न करता त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, आग आटोक्यात आल्यानंतर त्यांना चक्कर आली होती.

आगीची तीव्रता भीषण होती व आजूबाजूला रहिवासी असल्याने चारही बाजूने दहा वाहनांच्या साह्याने पाण्याचा मारा करीत जवानांनी आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने मोठा धोका टळला. घटनेत जखमी वा जीवितहानी नाही.

                         – देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी, पुणे मनपा

धायरीत गस्तीवर असताना आग लागल्याचा फोन आला. दहा मिनिटांतच आम्ही घटनास्थळी पोहचलो. आगीने रौद्र रूप धारण केले होते. तत्काळ शेजारील इमारतीमधील लोकांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविले.

                                – शैलेश संखे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सिंहगड रोड

सात वाजता मी कामावरून आलो. त्याच्या अर्धा तास अगोदर आग लागली होती. धुराचे लोट आकाशात जात होते. आम्ही स्वप्नाली अपार्टमेंटमधील सर्व नागरिकांना बाहेर काढून सोसायटी खाली केली. सर्वजण आग लागल्याचे पाहून घाबरले होते. सर्वांना सुरक्षितस्थळी हलविले.
                                                  – संतोष थोरात, प्रत्यक्षदर्शी

Back to top button