बारामतीमधील शासकीय कार्यालये संपामुळे ओस! | पुढारी

बारामतीमधील शासकीय कार्यालये संपामुळे ओस!

बारामती; पुढारी वृत्तसेवा : जुन्या पेन्शन योजनेच्या मुद्द्यावर आक्रमक झालेल्या कर्मचार्‍यांनी बारामती पंचायत समितीत आंदोलन केले. जिल्हा परिषद, पंचायत समितीचे कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचार्‍यांनीही आंदोलनात सहभाग घेतल्याने बारामतीतील सरकारी कार्यालये ओस पडली होती. आंदोलनामुळे कामकाजावर परिणाम झाला असून, नागरिकांची कामे आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी खोळंबली. तालुक्यातील 100 पेक्षा जास्त ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी, 10 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रातील सुमारे 237 आरोग्य कर्मचारी संपात सहभागी झाल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडून गेल्याचे चित्र बारामतीत पाहायला मिळाले.

प्रांताधिकारी कार्यालय व तहसील या महसूल विभागातील कर्मचार्‍यांनीही सहभाग घेतल्याने कर्मचार्‍यांविना अधिकार्‍यांनाच कामकाज करावे लागले. महसूल विभागातील तलाठी, वरिष्ठ व कनिष्ठ लिपीक, कारकून व कोतवाल आदी सुमारे 150 कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते. जुनी पेन्शन योजना सुरू करावी यासाठी राज्य सरकारी कर्मचार्‍यांनी आंदोलनाची हाक दिली असून यातून शासनाने तातडीने मार्ग काढण्याची मागणी कर्मचार्‍यांनी केली आहे.

महिला कर्मचार्‍यांनीही आंदोलनात सहभाग घेत सरकारने मागण्या मान्य करण्याची जोरदार मागणी केली. कामकाज ठप्प झाल्याने तालुक्याच्या विविध भागातून आलेल्या नागरिकांना मात्र नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. आंदोलनाबाबत अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही.

Back to top button