पुणे : शहरात निसर्गाचा वसंतोत्सव; फुले, झाडे बहरली, निसर्गाने दिली वर्दी | पुढारी

पुणे : शहरात निसर्गाचा वसंतोत्सव; फुले, झाडे बहरली, निसर्गाने दिली वर्दी

आशिष देशमुख

पुणे : लाल केशरी रंगाचा शालू पांघरुन पळस बहरला आहे. पिवळ्या रंगाच्या फुलांची उधळण करीत टेकड्यावर भुत्या, विलोभनीय महाधावडा, वायवर्णाची पांढरी-पिवळी फुलं वसंत ऋतू बहरल्याची साक्ष देत आहेत. शहरातील सर्वच टेकड्या अन् उद्यानांत हे दृष्य दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात गुढीपाडव्यापासून ते 20 मे पर्यंत वसंत असल्याची पारंपरिक समजूत चुकीची असून, फेब्रुवारीच्या मध्यापासून ते एप्रिलच्या मध्यापर्यंतचा काळ वसंत ऋतू असल्याचे वनस्पतिशास्त्रज्ञांचे म्हणणे अचूक ठरते आहे.

मराठी कॅलेंडरनुसार आपल्याकडे वसंत ऋतू गुढी पाडव्यापासून सुरू असतो, असे मानले जाते. दर वर्षी गुढीपाडवा मार्चच्या तिसर्‍या किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येतो. तिथपासून मे अखेरपर्यंत वसंत ऋतू मानला जातो. यंदा गुढी पाडवा 22 मार्च रोजी आहे. त्यामुळे त्या दिवसापासून 20 मेपर्यंत वसंत ऋतूची कालगणना यंदा केली जाईल.

शिवण: ‘जेमिलीया अर्बोरेया’ असे
याचे वनस्पतिशास्त्रातील नाव असून, समुद्रकिनारी खारफुटीच्या जंगलात उगवतो. रामायणात उल्लेख आहे.

मात्र, शहरातील वनस्पतिशास्त्राचे ज्येष्ठ संशोधक प्रा. श्री. द. महाजन यांच्या मते खरा वसंत हा 16 फेब्रुवारी ते 15 एप्रिल या कालावधीतच असतो, कारण याच कालावधीत महाराष्ट्रासह भारतातील वसंतात फुलणार्‍या वनस्पतीच या ऋतूचे खरे साक्षीदार आहेत. याच कालावधीत निसर्गात जी झाडे फुलतात ती प्रसन्न वसंताची वर्दी देतात. प्रा. महाजन यांच्या दाव्यानुसार खरा वसंत आत्ताच असतो.

तो 15 फेब्रुवारीला सुरू होऊन 15 एप्रिल म्हणजे दोनच महिने असतो. त्यापुढे प्रखर उन्हाळा सुरू होतो. त्यामुळे त्याला ग्रीष्म ऋतूचा काळ म्हणायला हवे. याच काळात प्रखर उन्हामुळे झाडांच्या बिया वाळून खाली पडतात अन् पावसाळ्यात जूनमध्ये त्यातून पुन्हा रोपांची निर्मिती होते, असे हे निसर्गाचे गाणित आहे.

शिरीष : हा देखील प्राचीन भारतीय वृक्ष असून, महाकवी कालिदासाच्या शाकुंतलात याचे वर्णन आहे. (सर्व छायाचित्रे : अनंत टोले)

कोण आहेत प्रा. महाजन..?
प्रा. श्री. द. महाजन हे ज्येष्ठ वनस्पतिशास्त्रज्ञ आहेत. वनस्पतींच्या वर्गीकरण शास्त्राचे तज्ज्ञ आणि देवरायांचे अभ्यासक आहेत. ते जंगल-वनांमध्ये भटकून संशोधन करतात. महाजन यांनी कोल्हापूर येथे निसर्ग मित्र मंडळ स्थापन केले होते आणि या मंडळातर्फे देवराई वाचवा ही चळवळ त्यांनी उभी केली. पुण्यातही त्यांनी निसर्गाची ओळख करून देण्याचे आणि निसर्गसंवर्धनाचे अनेक उपक्रम सुरू केले असून, निसर्ग सेवक संघातर्फे घेण्यात येणार्‍या परिचयवर्गातही महाजन यांचे महत्त्वाचे योगदान आहे.

वसंतात फुलतात ही झाडे…
वसंतात पळस, सोनसावर, पांगारा, अशोक, कांचन, काटेसावर, गेळा, धावडा, फणशी, बेल, महाधावडा, मेडशिंगी ही झाडे फुलतात. पळसाची लाल केशरी रंगीची फुले आपल्याला वसंताच्या आगमनाची वर्दी फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यापासूनच देतात. तसेच, बेलाचे झाड जानेवारीपर्यंत शुक्र कोरडे झालेले असते, मात्रफेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान त्याला नवी पालवी येते, ही कोवळी पानेही वसंताच्या आगमनाची चाहूल देतात.

महाराष्ट्रासह भारत अन् जगातही..

अशोक : कोकणासह कोल्हापूर जिल्हा
कांचनः हिमालय पर्वतराजीपासून नर्मदा खोरे
काटेसावरः श्रीलंका, म्यानमार, दक्षिण अमेरिका, चीनचा काही भाग
गेळाः कोकण, मावळ, महाबळेश्वर, माथेरान, खंडाळा
धावडाः मध्य भारत, दक्षिण भारत
मेडशिंगीः नाशिक ते बेळगाव रानपांगारा कोकण,मावळ, नंदुरबार,नाशिक, गोवा

येथे पाहा वसंताची झाडे..

फणशी: डेक्कन जिमखाना मैदानालगत
भुत्याः तळजाईसह सर्वच टेकड्या
महाधावडाः पत्रकार नगर, विद्यापीठ परिसर, एम्प्रेस गार्डन, शुक्रवार पेठेतील वाडिया हॉस्पिटल
वायवर्णः कर्वेनगर उद्यानाजवळ

वनस्पती देतात ॠतूच्या आगमनाची वर्दी..
प्रा. महाजन यांनी सांगितले, की मराठी कॅलेंडरनुसार चैत्रात वसंताची सुरुवात होते. त्यानुसार यंदा 22 मार्च रोजी गुढीपाडव्या पासून वसंत ऋतू कॅलेंडरमध्ये दिला आहे. मात्र एप्रिल व मे हे महिने खूप जास्त उन्हाळ्याचे असतात, त्याच महिन्यात फुल झाडे बहरत नाहीत. वातावरणातला अल्हाददायकपणा हरवलेला असतो. खरे तर वनस्पतीच ऋतूंच्या आगमनाची वर्दी देतात. त्यानुसार खरा वसंत 16 फेब्रुवारी रोजी सुरू होतो, 15 एप्रिल रोजी संपतो दरम्यान गुढीपाडवाही येतो. या कालावधीत झाडांना नवी पालवी येते.

सर्व टेकड्यांवर आवर्जून जा…
प्रा. महाजन म्हणतात, निसर्गाचा वसंतोत्सव पाहावयाचा असेल, तर शहरातील सर्व टेकड्यांवर जा. तेथे वसंतात फुलणार्‍या झाडांचे दर्शन होते. भुत्या सर्वच टेकड्यावर दिसेल.त्याची पिवळ्या रंगाची फुले तुम्हाला मी भुत्या आहे, हेच सांगतील.

Back to top button