पुणे : वाहतूक नियमनाऐवजी करत होता वसुली! पोलिस निलंबित

पुणे; पुढारी वृत्तसेवा : वाहतूक नियमनाऐवजी वाहन चालकांना थांबवून त्यांच्याकडून वसुलीचा प्रयत्न करणार्या वाहतूक विभागातील एका पोलिस कर्मचार्याला निलंबित करण्यात आले. पोलिस नाईक अनिल कल्लाप्पा जामगे असे निलंबित केलेल्या कर्मचार्याचे नाव आहे. पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. अनिल जामगे हे फरासखाना वाहतूक शाखेत कार्यरत होते. 11 मार्च रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी जामगे यांची शिवाजी रोडवरील बुधवार चौकात नेमणूक होती.
दोघे जण दुचाकीवर सायंकाळी 7 वाजता बुधवार चौकातील सिग्नलला थांबले होते. त्यावेळी त्यांच्याकडील अन्य जिल्ह्यातील दुचाकी पाहून जामगे यांनी त्यांना अडविले. लायसन्सची विचारणा केली. त्यांच्याकडे लायसन्स नसल्याने विनालायसन्स वाहन चालविण्याकरिता 5 हजार रुपये दंड असल्याचे सांगितले. गाडीचे मालक दुसरे असल्याने चालक व मालक असे 10 हजार रुपये दंड भरण्यास सांगितले. तक्रारदार यांना 500 रुपये रोख आणण्यास सांगितले. तक्रारदार हे एटीएममध्ये पैसे आणण्यासाठी गेले होते.
त्यांच्याकडे एटीएम नसल्याने ते परत आले. त्यानंतर जामगे याने तक्रारदार यांची गाडी वाहतूक विभागात आणली. स्वत:ची नेमप्लेट पाडून आपली ओळख लपविली. यापूर्वी वरिष्ठांना व पोलिस अंमलदारांना कारवाईदरम्यान बॉडी कॅमेरे वापरण्याबाबत वेळोवेळी आदेश दिले होते; परंतु त्याने बॉडी कॅमेरा बाळगला नाही व दिलेल्या आदेशाचे पालन केले नाही.
संकष्टी चतुर्थी असल्याने शिवाजी रोडवर मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होती व त्यामुळे दगडूशेठ मंदिर व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. अशा वेळी तक्रारदार यांची गाडी अडवून त्यांच्याशी चर्चा करण्यामध्ये विनाकारण वेळ वाया घालविला व नेमून दिलेल्या वाहतूक नियमानाच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे बेशिस्त बेजबाबदार वर्तन केल्याने अनिल जामगे यांना वाहतूक शाखेचे उपायुक्त विजय कुमार मगर यांनी निलंबित केले आहे.