पुणे: रिक्षांचे रुपांतर ई- रिक्षात करण्यासाठी पालिका देणार 25 हजारांचे अनुदान | पुढारी

पुणे: रिक्षांचे रुपांतर ई- रिक्षात करण्यासाठी पालिका देणार 25 हजारांचे अनुदान

पुणे, पुढारी वृत्तसेवा: शहरात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिका आता रिक्षांचे रुपांतर ई रिक्षामध्ये करण्यासाठी 25 हजाराचे अनुदान देणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

देशासह राज्यात इंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन कार्यक्रमानुसार महापालिकेने इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान योजना आखली आहे. त्यानुसार शहरात ई रिक्षा रस्त्यावर आणण्यासाठी महापालिका 25 हजराचे अनुदान देणार आहे. यापूर्वी महापालिका शहरातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी तीन चाकी ऑटो रिक्षांना सीएनजी किट बसविण्यासाठी प्रत्येकी बारा हजार रुपये अनुदान देत होती.

दरम्यान, प्रत्येक रिक्षाला ई-रिक्षामध्ये रूपांतरित करण्यासाठी सुमारे 70 हजार रुपये खर्च येतो. प्रत्येक रिक्षाचे रिट्रोफिट करण्यासाठी पालिका 25 हजार रुपये देईल. तर उर्वरित 60 टक्के रक्कम वाहन मालकाला खर्च करावी लागणार आहे. याशिवाय पालिका या इ रिक्षांच्या चार्जिंगसाठी शहरात विविध ठिकाणी चार्जिंग स्टेशन देखील उभारणार आहे.

Back to top button