वडगावला पुन्हा वितरिका बुजवली; प्लॉटिंग व्यावसायिकांचे धारिष्ट्य | पुढारी

वडगावला पुन्हा वितरिका बुजवली; प्लॉटिंग व्यावसायिकांचे धारिष्ट्य

बारामती; पुढारी वृत्तसेवा : वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथे जलसंपदा विभागाच्या पाणी वाहून नेणार्‍या वितरिका क्रमांक 11 ला रात्रीच्या वेळी बुजवून टाकण्याचा प्रकार दुसर्‍यांदा घडला आहे. प्लॉटिंगधारकांचे धारिष्ट्य वाढत असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. गेल्या सहा महिन्यांपूर्वीही असा प्रकार घडला होता. दै. ‘पुढारी’त वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर ही वितरिका जलसंपदा विभागाने पूर्ववत केली होती. त्यानंतर आता पुन्हा तसाच प्रकार घडला आहे.

गेल्या सहा महिन्यांपूर्वी येथील शेतकर्‍यांनी प्लॉटिंगसाठी क्षेत्र विक्रीला काढले. या वेळी संबंधिताने वितरिकेला कुंपण घातले होते. वितरिकाच बुजवून टाकल्याने स्थानिक शेतकरी कमालीचे आक्रमक झाले होते. त्यांनी जलसंपदा विभागाकडे धाव घेत तत्काळ कार्यवाहीची मागणी केली होती. दै. ’पुढारी’ने शेतकर्‍यांची बाजू मांडत याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले.

त्यानंतर जलसंपदा विभागाने याप्रश्नी लक्ष घातले. पाणी वापर संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी जलसंपदा विभागाची मदत घेत जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण हटवत वितरिका पूर्ववत केली होती. या वेळी संबंधितांना यापुढे असा प्रकार करू नये, अशी समज देण्यात आली होती. परंतु, संबंधितांकडून सहा महिन्यांनंतर पुन्हा वितरिका बुजविण्याचा प्रकार घडला आहे. रात्रीच्या वेळी थेट वितरिकाच बुजविण्यात आली असून, पाणी काढून देण्यासाठी दुसर्‍या बाजूने चारी काढली गेली आहे.

प्लॉटिंगमध्ये वितरिकेची अडचण येत असल्याने वितरिकेचा मार्ग बदलण्याचे कारस्थान प्लॉटिंगवाल्यांकडून करण्यात आले आहे. दरम्यान, सोमवारी (दि. 13) वडगाव निंबाळकर जलसंपदा विभागाचे शाखाधिकारी बाजीराव पोंदकुले, कालवा निरीक्षक शर मोरे यांनी घटनास्थळी भेट देत संबंधितांवर कारवाईचे आश्वासन दिले आहे.

Back to top button