बोरीबेल रेल्वे भुयारी मार्गासाठी 10 कोटींचा निधी : आ. राहुल कुल | पुढारी

बोरीबेल रेल्वे भुयारी मार्गासाठी 10 कोटींचा निधी : आ. राहुल कुल

खोर/रावणगाव; पुढारी वृत्तसेवा : बोरीबेल येथील रेल्वे भुयारी मार्गासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. दौंड तालुक्यातील रावणगाव, देऊळगाव राजे मार्गावर बोरीबेल गावाजवळ रेल्वे भुयारी मार्ग ( ठणइ) बांधण्यासाठी हा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली आहे. रेल्वे लाईनमुळे बोरीबेल हे गाव दोन भागात विभागले गेले आहे. पाणी वाहून जाण्यासाठी काढलेल्या छोट्या मोरीतून एका भागातून दुसर्‍या भागात जाण्यासाठी नागरिकांना प्रवास करावा लागत होता.

ही मोरी छोटी असल्याने त्यातून फक्त छोटी वाहने जातात. त्या ठिकाणी मोठ्या भुयारी मार्गाची मागणी मागील अनेक वर्षांपासून येथील नागरिक करीत होते. याचा विचार करून आमदार राहुल कुल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरवा करून 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. 7 मीटर रुंद व 6 मीटर उंच असलेल्या या भुयारी मार्गामुळे नागरिकांचे दळणवळण सोपे होणार आहे. मोठ्या वाहनांना रेल्वेमार्गाच्या दुसर्‍या भागात जाण्यासाठी पार करावे लागणारे लांबचे अंतरदेखील कमी होणार आहे. यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून आमदार राहुल कुल यांनी मंजूर केलेल्या या कामाबाबत नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.

Back to top button