आळंदी : इनाम जमिनींसाठी आंबेडकरी संघटना रस्त्यावर | पुढारी

आळंदी : इनाम जमिनींसाठी आंबेडकरी संघटना रस्त्यावर

आळंदी; पुढारी वृत्तसेवा : आळंदी शहरात असलेल्या इनाम वर्ग 6 ब (महार वतन)च्या जागा आळंदी नगरपालिकेने बेकायदेशीरपणे विनामोबदला ताब्यात घेतल्या आहेत. त्या रिकाम्या कराव्यात अन्यथा त्याचा मोबदला दिला जावा, या मागणीसाठी आळंदीत विविध आंबेडकरी संघटना रस्त्यावर उतरल्या. नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करत ’महार वतन जागा बळकावणार्‍या ’आळंदी नगरपालिकेचा धिक्कार असो’, ’आमच्या जागा परत द्या; नाहीतर खुर्ची खाली करा,’ अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या.

रिपब्लिकन सेना, दलित पँथर, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, सिद्धार्थ ग्रुप आदी संघटना व आळंदी ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते. या वेळी माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, रिपब्लिकन सेना पुणे जिल्हाध्यक्ष संदीप रंधवे, उपाध्यक्ष सदानंद गवई, युवक अध्यक्ष संदीप साळुंके, महिला अध्यक्ष भीमा तुळवे, पुणे शहराध्यक्ष सचिन सूर्यवंशी, खेड तालुकाध्यक्ष विशाल दिवे, खेड तालुकाध्यक्षा आशा कुटे, भोसरी विधानसभा अध्यक्षा उषा वाघमारे, खेड तालुका उपाध्यक्षा नंदिनी पवळे, आनंद गंगावणे, दलित पँथर खेड तालुकाध्यक्ष रवींद्र रंधवे, शिवसेना विभागप्रमुख प्रसाद दिंडाळ यांच्यासह आळंदी, पिंपरी-चिंचवड व पुणे शहर परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

वर्षानुवर्षे इनाम वर्ग 6 ब च्या जागा पाण्याची टाकी, बसस्थानक, नगरपरिषद इमारत, पीएमपीएमएल थांबा, स्मशानभूमी, शॉपिंग सेंटर, शाळा क्रमांक दोन, तसेच ग्रामीण रुग्णालयासाठी नगरपालिकेने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्या आहेत. त्यांचा कुठलाही मोबदला दिला नाही. त्या दंडेलशाहीने ताब्यात घेतल्या गेल्या आहेत. एकतर त्याचा मोबदला मिळावा किंवा आमच्या जागा रिकाम्या कराव्यात तसेच स्मशानभूमी आरक्षित जागेत हलवावी व भाजी मंडईला कायमस्वरूपी आरक्षित प्रशस्त जागा द्यावी, आदी मागण्यांसाठी आंदोलन केल्याचे दलित पँथर खेड तालुकाध्यक्ष रवींद्र रंधवे यांनी सांगितले.

नगरपरिषदेत सध्या लोकप्रतिनिधींची (नगरसेवक) सर्वसाधारण सभा अस्तित्वात नसल्याने शहरातील धोरणात्मक निर्णय घेण्याचे सर्वसाधारण सभेचे अधिकार प्रशासक यांना आहेत. त्यामुळे भाजी मंडई स्थलांतरासह इतर मागण्यांशी संबंधित सर्व घटकांची बैठक घेण्याबाबात प्रशासकांना लेखीपत्राद्वारे कळविण्यात आले आहे. या बैठकीत जो निर्णय होईल त्याची अंमबजावणी केली जाईल. इतर मागण्यांबाबतदेखील लवकरच बैठक बोलवू.

                                                          – कैलास केंद्रे,
                                       मुख्याधिकारी, आळंदी नगरपरिषद

Back to top button