पिंपरी : प्रशासकीय राजवटीत कामे रखडली; राजकीय पक्ष शहराध्यक्ष, पदाधिकार्‍यांच्या भावना | पुढारी

पिंपरी : प्रशासकीय राजवटीत कामे रखडली; राजकीय पक्ष शहराध्यक्ष, पदाधिकार्‍यांच्या भावना

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्रशासकीय राजवटीत प्रभागातील कामे होत नाहीत. निधी नसल्याने काम करता येत नसल्याचे सांगत अधिकारी जबाबदारी झटकत आहेत. कामे रखडल्याने नागरिकांसह माजी नगरसेवक वैतागले आहेत. त्यामुळे लवकर महापालिका निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी शहरातील विविध राजकीय पक्ष शहराध्यक्ष व पदाधिकार्‍यांनी व्यक्त केल्या आहेत.

‘प्रशासकीय राजवटीत नागरिक नाखूश !’असे ठळक वृत्त ‘पुढारी’ने शनिवार (दि.11) प्रसिद्ध केले होते. त्याबाबत शहरभरातून नागरिक व राजकीय पदाधिकार्‍यांनी आपले मते मांडून प्रशासक राजवटीवर नाराजी व्यक्त केली आहे. लवकरात लवकर प्रशासक हटवा, अशी मागणी नागरिकरांतून होत आहे.

गेल्या वर्षी 13 मार्चपासून आयुक्त हे प्रशासक म्हणून संपूर्ण महापालिकेचे कामकाज पाहत आहेत. नगरसेवक नसल्याने अधिकारी नागरिकांच्या तक्रारी व प्रलंबित कामे पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. अधिकारी मर्जीप्रमाणे वागत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. प्रशासक हटवून तात्काळ निवडणूक घ्यावी, अशी भावना शहराध्यक्षांसह पदाधिकार्‍यांनी व्यक्त
केली आहे.

प्रशासकीय राजवटीत अनेक गैरव्यवहार
प्रशासकीय राजवटीत अधिकारी मनमानी पद्धतीने काम करीत आहेत. त्यांच्यावर लोकप्रतिनिधींचा अंकुश राहिलेला नाही. गेल्या वर्षभरात अनेक गैरव्यवहार उघडकीस आले आहेत. त्याला विरोध करूनही त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. तसेच, निधी नसल्याचे कारण पुढे करून, कामे करण्यास असमर्थता व्यक्त केली जात आहे. हा प्रकार थांबला पाहिजे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी सांगितले.

वर्षभरात विकासकामांना गती नाही
सर्वसाधारण सभा, स्थायी समिती सभेत धोरणात्मक निर्णय घेतले जातात. त्यांची अंमलबजावणी करण्यात येते. प्रभागातील कामांच्या तरतुदी केल्या जातात. प्रश्न सोडविण्यासाठी नगरसेवक हे जवळचे माध्यम आहे. मात्र, प्रशासकीय राजवटीत नगरसेवक नसल्याने वर्षभरात विकासकामांना गती मिळालेली नाही, असे माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी सांगितले.

प्रशासकाचे काम उदासीन
प्रशासकाचे काम उदासीन आहे. लोक नाराज आहेत. रस्ते, दूषित पाणी, कचरा आदी प्रश्नांकडे कोणाचे लक्ष नाही.
कोणाचे लक्ष नसल्याने जनतेच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे. राज्य सरकारने तातडीने महापालिकेच्या निवडणुका घ्याव्यात. त्यामुळे जनतेचा पैसा योग्य कामाला लागेल, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे
शहरप्रमुख, माजी नगरसेवक अ‍ॅड. सचिन भोसले यांनी सांगितले.

…मग पालिकेची का नको ?
प्रशासक आपल्या पद्धतीने कारभार करीत आहे. पाणी, विद्युत, साफसफाई, स्थापत्य, ड्रेनेज या कामांकडे लक्ष नाही. पालिकेची निवडणूक लवकर घेऊन प्रशासकीय राजवट हटवा. चिंचवड विधानसभेची निवडणूक होऊ शकते. मग, पालिकेची निवडणूक का घेत नाहीत. सत्ताधारी व राज्य सरकार नागरिकांना मूर्खात काढत आहे. प्रशासक राजवटीचा निषेध करीत आहोत, असे मनसेचे शहराध्यक्ष, माजी नगरसेवक सचिन चिखले यांनी सांगितले.

ठराविक भागास भरपूर निधी; इतर प्रभागास ठेंगा
एका विशिष्ट भागांकडे निधी वळविला जात असल्याने त्या भागांत जोरात कामे सुरू आहेत. मात्र, आमच्या थेरगाव भागात निधी नाही, म्हणून अधिकारी हातवर करीत आहेत. त्यामुळे अनेक कामे प्रलंबित आहेत. अधिकारी कोणाचे ऐकत नाहीत. कामाबाबत भेदभाव केला जात असल्याने संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराचा विकास कसा होणार? असे, अपक्ष आघाडीचे माजी गटनेते कैलास बारणे यांनी सांगितले.

निवडणुका लवकरात लवकर घ्याव्यात
प्रशासकीय राजवटीत अधिकारी नागरिकांच्या समस्या सोडविण्याकडे साफ दुर्लक्ष करीत आहे. विविध कारणे देऊन समस्या आहे तशाच ठेवल्या जात आहेत. दैनंदिन तक्रारींकडेही दुर्लक्ष केले जात आहे. राज्य सरकारने तात्काळ महापालिका निवडणूक घ्याव्यात. नगरसेवक शहरात चांगल्या प्रकारे काम करू शकतील, असे काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांनी सांगितले.

Back to top button