तळेगाव दाभाडे : …तोपर्यंत कारवाई करू नका : माजी मंत्री बाळा भेगडे | पुढारी

तळेगाव दाभाडे : ...तोपर्यंत कारवाई करू नका : माजी मंत्री बाळा भेगडे

तळेगाव दाभाडे : सोमाटणे टोलनाका बंद करण्याबाबत राज्य सरकारशी सकारात्मक चर्चा करून योग्य तोडगा काढण्याचा प्रयत्न करू तसेच, तोपर्यंत पोलिस प्रशासनाने आंदोलनकर्त्यांवर कोणतीही कारवाई करू नये, अशा सूचना माजी मंत्री बाळा भेगडे यांनी पोलिसांना केली. सोमाटणे टोलनाका कृती समितीच्या वतीने टोलनाका बंद करण्याच्या मागणीसाठी तिसर्‍या दिवशी उपोषण करण्यात येत आहे. या वेळी बाळा भेगडे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, माजी उपनगराध्यक्ष सत्येंद्रराजे दाभाडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गणेश काकडे, कात्रज डेअरीचे संचालक बाळासाहेब नेवाळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्तात्रय गुंड, संतोष दाभाडे पाटील, मिलिंद अच्युत, कल्पेश भगत उपस्थित होते.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर लवकरच बैठक
या वेळी भेगडे म्हणाले, की मागील वर्षी किशोर आवारे यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन पुकारले होते. त्याची नुसती बोळवण केली; पण आता हा टोलनाक्याचा त्रास तळेगाव तसेच मावळवासीयांना सहन होत नाही. याला योग्य न्याय मिळावा म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर बैठक आयोजित करण्यात येणार आहे.

टोलनाका बंद केला पाहिजे आणि जनतेला न्याय मिळाला पाहिजे या मागणीला राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे. सोमाटणे टोलनाका बंद व्हावा. ही भूमिका आमची पहिल्यापासून असून, तो देहूरोड किंवा इतर ठिकाणी जावा अशी नाही.

                                                                 – गणेश खांडगे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी

Back to top button