पिंपरी : ‘त्या’ बांधकामांना लष्कराची एनओसी आवश्यक | पुढारी

पिंपरी : ‘त्या’ बांधकामांना लष्कराची एनओसी आवश्यक

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : लष्करी विभागाच्या आस्थापनेपासून 10 ऐवजी 50 मीटर अंतराच्या परिघातील बांधकामांना स्थानिक लष्करी विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेण्याची सक्ती करण्यात आली होती. तो नियम नुकताच स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे 10 मीटर अंतराच्या परिघातील बांधकामांच्या फाईली लष्कराच्या विभागाकडे मंजुरीसाठी पाठविल्या जात आहेत, असे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

नवी दिल्लीच्या संरक्षण मंत्रालयाने 23 डिसेंबर 2022 ला नवीन नियमावली जाहीर करीत, लष्करी आस्थापनापासून 10 ऐवजी 50 मीटर परिघात बांधकाम करण्यास निर्बंध घातले होते. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांसह जागामालकांचे धाबे दणाणले होते. त्या 50 मीटर परिघात बांधकाम करण्यासाठी स्थानिक लष्करी विभागाची एनओसी घेणे बंधनकारक केले होते.

पिंपरी-चिंचवड शहरात नवी सांगवी येथील औंध मिलिटरी कॅम्प आणि पिंपरी येथील मिलिटेरी डेअरी फार्म या आस्थापनेच्या 50 मीटर परिघात बांधकामांना नवे निर्बंध लादण्यात आले होते. त्यात पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, सांगवी, नवी सांगवी, पिंपरी, पिंपरी कॅम्प, पिंपरीगाव या परिसरात समावेश होता. त्यामुळे त्या भागांतील बांधकाम व्यावसायिक व जागामालकांचे धाबे दणाणले होते.

या भागातील चार गृहप्रकल्पाचे प्रस्ताव बांधकाम परवानगी विभागाकडे आले होते. ते प्रस्ताव पालिकेकडे एनओसीसाठी लष्करी विभागाकडे पाठविले होते. दरम्यान, 50 मीटर अंतराचा नियमाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे 50 मीटर अंतराची मर्यादा महापालिकेने काढून टाकली आहे. लष्करी आस्थापनेपासून 10 मीटर अंतरावरील बांधकामांना बांधकाम परवानगीसाठी लष्कराची एनओसी सक्तीची आहे.

Back to top button