पुणे : झेडपीचे कर्मचारी आजपासून संपावर; सामान्यांची कामे खोळंबणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसह जिल्हा परिषदेच्या लिपिक कर्मचार्यांचे वेतन त्रुटीचे व अन्य प्रश्न सुटलेले नाहीत. मंगळवारपासून (दि. 14) संपावर जाण्याचा निर्णय राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेने घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर सकाळी दहा वाजता निदर्शने केली जाणार आहेत. जिल्हा परिषदेचा अधिकारीवर्ग वगळता सर्वच कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत.
गावपातळीवर काम करणारे ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी देखील संपात सहभागी होणार असल्याने नागरिकांची कामे खोळंबणार आहेत. त्यामध्ये ग्रामपंचायतींमधील नोंदणी, आरोग्य तपासणी, आरोग्याबाबतच्या नोंदीची कामे थांबणार आहेत. आरोग्य केंद्रातील डॉक्टर मात्र संपामध्ये सहभागी नसून, इतर कर्मचार्यांचा संपात सहभाग असल्याने आरोग्य यंत्रणेवरही याचा परिणाम होणार आहे. याशिवाय पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील कामावर संपाचा परिणाम होणार आहे.
दरम्यान, लिपिक कर्मचार्यांच्या सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करणे, लिपिकांच्या बदल्यांबाबत अन्यायकारक धोरण रद्द करणे, सुधारित आकृतिबंधामध्ये लिपिकांची पदे वाढविणे, शासकीय कर्मचार्यांप्रमाणे गृहबांधणीसाठी साहाय्य मिळावे, सहाव्या वेतन आयोगाचे हप्ते आदी मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेखर गायकवाड आणि सचिव किशोर कुलकर्णी यांनी दिली. जुनी पेन्शन योजना त्वरित सुरू करावी, ही प्रमुख मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.