पुणे : ‘कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करा’ | पुढारी

पुणे : ‘कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करा’

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अवकाळी पावसामुळे गहू, कांदा, हरभरा, द्राक्षबागांचीही मोठ्या प्रमाणात हानी झाली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकर्‍यांची आत्महत्या नवीन नाही, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. हे शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळणे आहे. त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

शेतकर्‍यांंच्या कोणत्याच पिकाला योग्य भाव मिळत नाही. परिणामी, मातीमोल भावात विकावे लागत आहे. सरकारने या परिस्थितीचा विचार करून नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या पिकांचे ताबडतोब पंचनामे करावेत, त्यांच्या खात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा करावी, कोरडवाहूसाठी एकरी 25 हजार रुपये तर बागायत क्षेत्रासाठी एकरी 50 हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशा मागण्या शहराध्यक्ष अविनाश मोहिते यांनी केल्या.

नवनीत या खासगी प्रकाशनने वेळापत्रकात बदल करून 8 मार्चला असणारा पेपर 9 मार्चला टाकून हजारो विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने नवनीत पब्लिकेशनची चौकशी करून कडक कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली. या वेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, संदीप कारेकर, जोतिबा नरवडे, नीलेश ढगे, अमित लोंढे, अंकुश हाके आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

Back to top button