पुणे कॅन्टोन्मेंट निवडणूक : वाढीव ’एफएसआय’चे आश्वासन हवेतच! | पुढारी

पुणे कॅन्टोन्मेंट निवडणूक : वाढीव ’एफएसआय’चे आश्वासन हवेतच!

समीर सय्यद

पुणे : मागील निवडणुकीत रहिवाशांना वाढीव ‘एफएसआय’चे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे वॉर्डातील अनेक भागांचा विकास रखडला असून, लष्करी वसाहत आणि नागरी वस्ती या वॉर्डात एकत्र नांदते. त्यामुळे लष्करी अधिकारी व कर्मचार्‍यांचा वावर अधिक असल्याने वॉर्डात वेळेत नागरी सुविधा पुरविण्याची खबरदारी बोर्ड प्रशासन घेते.

वाहतुकीच्या कोंडीमुळे दैनंदिन प्रवासाला लागणारा ’ब्रेक’, पुनर्विकास व दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या इमारती, सार्वजनिक स्वच्छतागृहांची बिकट अवस्था, भाजी मंडईचा अभाव आदी नागरी समस्यांनी पुणे कँटोन्मेंट बोर्डाचा वॉर्ड क्रमांक सहा- वानवडी बाजार आणि फातिमानगर- पाच वर्षांनंतरही ग्रासलेला आहे. वानवडी बाजार, लगतचा एएफएमसी-लष्करी परिसर आणि फातिमानगर-भैरोबानाला हा सोसायटी परिसर अशी या वॉर्डाची रचना आहे. पंचरत्न सोसायटी, वानवडी रस्ता, पुलगेट, क्रॉस रोडचा काही भाग, पार्वती व्हिला रोड आदी परिसर या वॉर्डात येतो.

वानवडी भागात सर्वसामान्यांच्या विविध कार्यक्रमांसाठी बोर्डाचा कम्युनिटी हॉल असून, याठिकाणी आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून शेड उभारण्यात आली आहे. वानवडी भागात असलेली भाजी मंडई बोर्डाने बंद केली आहे. ती पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच इतर अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत.

                    – सचिन मथुरावाला, नामनिर्देशित सदस्य, कॅन्टोमेंन्ट बोर्ड, पुणे.

वॉर्डात विवाह कार्यालय, महादजी शिंदे शाळेत सभागृह, सेमी इंग्रजी माध्यमाची सुरुवात, गार्डन, भैरोबा नाल्याचे सुशोभीकरण, रस्ते अशी अनेक कामे सदस्य असताना पाच वर्षांत पूर्ण केली आहेत. त्यामुळे प्रशासक काळात करण्यासारखे काही काम शिल्लक नव्हते.

                   – विनोद मथुरावाला, माजी सदस्य, वॉर्ड क्रमांक सहा.

वानवडी बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असून, स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहांचीही दुरवस्था झाली आहे. तर रात्रीच्या वेळी वीजपुरवठाही सुरू नसतो. त्यामुळे महिलांची कुंचबणा होते. या मूलभूत समस्या सोडविण्याची मागणी केल्यास निधी नसल्याचे कारण दिले जाते.

                           – गीता राघवाचारी – पिल्ले, सामाजिक कार्यकर्त्या.

Back to top button