आळंदी : वनामध्ये देवराईप्रमाणेच नद्यांमध्ये होते देवडोह

श्रीकांत बोरावके
आळंदी : आजपर्यंत देवाच्या नावाने राखीव ठेवलेली वनराई हे तुम्हा-आम्हाला माहीत आहे. मात्र, देवाच्या नावाने राखीव ठेवलेले नदीतील डोह मात्र कालौघात सर्वजण विसरलो आहोत. मुळात ते असतात हेच आजच्या पिढीतील अनेकांना माहीत नाही. त्यावर संशोधन आणि संर्वधन करण्याची गरज आहे; अन्यथा खूप मोठा नैसर्गिक ठेवा काळाच्या ओघात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
देवडोह म्हणजे नदीतील एक खोलगट जागा असते. देवासाठी राखून ठेवलेले डोह म्हणून ’देवडोह’ असे नाव पडले आहे.
दुष्काळामध्ये देखील देवडोहांचे पाणी आटत नाही, असे म्हणतात. जंगलामध्ये देवराईमध्ये जसं वेगळेपण आणि वैविध्य असतं, त्याचप्रमाणे या डोहांमध्येदेखील जैवविविधतेबरोबरच येथील पाण्यात औषधी गुणधर्म असतात. जसं देवराईमध्ये वृक्षतोडीस बंदी असते तशीच देवडोहात मासेमारीस बंदी असते. हे मासे देवाचे आहेत, अशी श्रद्धा असते. तसेच प्रत्येक देवडोहात भांडी निघत होती.
भिवाई, कुंडाई, महादेव, मळगंगा, साती आसरा, ओझराई, दर्याबाई, तिळसेश्वर, कडजाई, गिरजाई या जलदेवता देवडोहांचे संरक्षण करतात असतात, अशी आख्यायिका आहे. देवडोहांवरील जत्रा, आख्यायिका, यात्रा आणि उत्सवांमार्फत मनुष्य हा नदी, नाले, तळी आणि कुंड यांच्याशी जोडला जातो.
देवडोह, देवनदी, देवकुंड आणि झरे ही संकल्पना आजकाल नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तीर्थांच्या ठिकाणी केवळ प्रदूषण आणि अर्थ माहात्म्य वाढत आहे. देवडोहांवरील श्रद्धा नामशेष झालेली असून, विकासकामांमुळे आणि प्रदूषणामुळे बरेच डोह नामशेष झालेले आहेत. देवडोह येथे माशांचे प्रजनन होते. देवडोहांवर आजपर्यंत कोणतेही संशोधन नाही. अनेक डोहांमधील मासे प्रदूषणाला बळी पडत आहेत. काही मासे हे येथील प्रदेशनिष्ठ मासे आहेत, त्यांची प्राणिशास्त्रीय ओळख पटवून संगोपन आणि संवर्धन करणे अत्यावश्यक आहे.
– प्रा. किशोर सस्ते, देवराई अभ्यासक आणि जैवविविधतातज्ज्ञ