पुणे : लसूण, आले, टोमॅटो, घेवडा, हिरवी मिरची, मटार महागला | पुढारी

पुणे : लसूण, आले, टोमॅटो, घेवडा, हिरवी मिरची, मटार महागला

पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक घटली आहे. बाजारात दाखल झालेल्या मालाच्या तुलनेत मागणी जास्त राहिल्याने रविवारी (दि. 12) लसूण, आले, टोमॅटो, हिरवी मिरची, घेवडा, मटारच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली. मागणीअभावी ढोबळी मिरची आणि तोतापुरी कैरीच्या भावात घसरण झाल्याचे सांगण्यात आले. बाजारात रविवारी (दि. 12) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे 80 ट्रक फळभाज्यांची आवक झाली.

परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक येथून 8 ते 10 टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक आणि गुजरात येथून 3 टेम्पो कोबी, राजस्थान येथून 4 ट्रक गाजर, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू येथून 4 टेम्पो शेवगा, गुजरात येथून 2 टेम्पो भुईमूग शेंग, कर्नाटक येथून 3 टेम्पो घेवडा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येथून तोतापूरी कैरी 7 टेम्पो, बँगलोर येथून 2 टेम्पो आले, मध्यप्रदेशातून लसूणाची 8 ते 10 टेम्पो इतकी आवक झाली. स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे 1200 ते 1300 पोती, टोमॅटो 12 हजार पेटी, गवार 4 ते 5 टेम्पो, भेंडी 5 ते 6 टेम्पो, हिरवी मिरची 2 ते 3 टेम्पो, काकडी 7 ते 8 टेम्पो, फ्लॉवर 8 ते 10 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, ढोबळी मिरची 10 ते 12 टेम्पो, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, कांदा 150 ट्रक, आग्रा, इंदौर, गुजरात आणि स्थानिक भागातून मिळून बटाट्याची 30 ते 32 ट्रक इतकी आवक झाली.

सर्व पालेभाज्यांचे भाव स्थिर

यंदा सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे उत्पादन चांगले आहे. अद्यापी उन्हाळ्याची तीव्रता भासत नसल्याने बाजारात सर्व पालेभाज्यांचा पुरवठा आतापर्यंत चांगला आहे. सध्या आभाळी वातावरण निर्माण झाल्याने पालेभाज्यांची काढणी लवकर होत आहे. परिणामी बाजारात आवक वाढून पालेभाज्यांच्या भावात घसरण झाली आहे. रविवारी घाऊक बाजारात सर्व प्रकारच्या पालेभाज्यांच्या भाव 2 रु.पर्यंत खाली आले होते. तर, किरकोळ बाजारात एका पालेभाज्याची गड्डीची विक्री 10 ते 15 रूपयापर्यंत केली जात आहे. रविवारी (दि. 12) मार्केट यार्डात कोथिंबिरीची दीड लाख जुडी आवक झाली. मेथीची 70 हजार जुड्या आवक झाली होती.

Back to top button