बेलसर-उरुळी कांचन रस्त्यावर बसले गतिरोधक

बेलसर(ता. पुरंदर); पुढारी वृत्तसेवा : बेलसर येथे बेलसर-उरुळी कांचन रस्त्यावर अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गतिरोधक बसवले आहेत. ’पुढारी’च्या दणक्याने सुस्त प्रशासनाला जाग आली आहे. ’बेलसर-उरुळी कांचन रस्त्यावर वारंवार अपघात’ या शीर्षकाखाली 5 मार्च रोजी दैनिक ’पुढारी’त वृत्त प्रसिद्ध झाले होते. बेलसर-उरुळी कांचन रस्त्यावर होणारे अपघात आणि त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षावर दृष्टिक्षेप टाकला होता.
बेलसर-उरुळी कांचन रस्त्यावर अनेक दिवसांपासून अपघातांना निमंत्रण देणारी ठिकाणे निर्माण झाली होती. याबाबत दैनिक ’पुढारी’च्या वृत्तात प्रशासनावर चांगलीच टीका झाली होती. अखेर कोथळे चौक, बालसिद्धनाथ विद्यालयाजवळ, आंबेडकर पुतळ्याजवळ, तसेच कल्याणी पब्लिक स्कूल नाशिक या अपघात प्रवण क्षेत्रात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदारांनी त्वरित कार्यवाही करीत गतिरोधक बसवले आहेत. ग्रामपंचायत बेलसरकडूनही याबाबत पाठपुरावा केला होता. आता त्याला यश आल्यामुळे रस्त्यांवर होणारे अपघात काहीअंशी कमी होणार आहेत. गतिरोधकांमुळे गाड्यांचा वेग मंद होत आहे. अपघातांवरही काही प्रमाणात निर्बंध येणार आहेत. त्यामुळे सर्व स्तरातून दैनिक ’पुढारी’चे कौतुक केले जात आहे.
साईडपट्ट्यांच्याही दुरुस्तीकडे लक्ष द्यावे
मागील अनेक वर्षांपासून बेलसर-उरुळी कांचन रस्त्यावर आणखीही समस्या आहेत.अद्यापही रस्त्याची साईड पट्टी अत्यंत खराब आहे. साईड पट्टीवर कुठल्याही प्रकारचे रोलिंग केले नाही. मोठमोठे दगडधोंडे वर आले आहेत, त्यामुळेही अपघात होऊ शकतो. त्यामुळे यावर रोलिंग करून साईडपट्टी सुस्थितीत करावी, अशी मागणी होत आहे.