पारगाव : बटाट्यालाही बाजारभावाचा ठेंगा | पुढारी

पारगाव : बटाट्यालाही बाजारभावाचा ठेंगा

पारगाव; पुढारी वृत्तसेवा : कांद्याचे दर कोसळ्याने बळीराजा अडचणीत असतानाच आता बटाटा उत्पादकांवरही संक्रांत आली. व्यापारी शेतात येऊन केवळ 8 रुपये किलोने बटाटे खरेदी करत आहेत. या बाजारभावातून भांडवल देखील वसूल होण्याची शक्यता नाही. पुढील काळात बटाट्याचा भाव आणखी घसरण्याची शक्यता आहे, त्यामुळे बटाटा उत्पादक शेतकरी आर्थकि अडचणीत सापडले आहेत.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात रब्बी हंगामातील बटाटा पिकाला बाजारभावाची साथ मिळाली नाही.

त्यानंतरही बहुतांशी शेतकर्‍यांनी बटाटा लागवड केली. या मागास बटाटा काढणीची कामे परिसरात सुरू आहेत. परंतु, या बटाट्यालाही कमी बाजारभाव मिळत आहे. व्यापारी थेट शेतात येऊन केवळ 8 रुपये किलोने बटाटे खरेदी करीत आहेत. मागील हंगामात याच काळात बटाट्याला प्रतिकिलो 14 ते 16 रुपये असा भाव होता. यंदा गळीत हंगामातील बटाटा उत्पादनात देखील मोठी घट झाली. तसेच सध्या मिळणारा बाजारभाव हा खूपच कमी आहे. या बाजारभावातून बटाटा पिकासाठी गुंतवलेले भांडवल वसूल होणार नाही, असे थोरांदळे येथील शेतकरी सूरज टेमगिरे यांनी सांगितले.

Back to top button