नागपूर परिसरात उन्हाळी बाजरीचे पीक फुलोर्‍यात | पुढारी

नागपूर परिसरात उन्हाळी बाजरीचे पीक फुलोर्‍यात

पारगाव(ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा :  तालुक्याच्या पूर्व भागात उन्हाळी बाजरीचे पीक फुलोर्‍यात आले आहे. यंदा पाणी मुबलक तसेच हवामानही अनुकूल असल्याने बाजरी उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. उन्हाळी हंगामात आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पारगाव, शिंगवे, रांजणी, वळती, नागापूर, थोरांदळे आदी गावांमध्ये बाजरीचे पीक शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेतात.

दिवसेंदिवस बाजरीचे बाजारभाव वाढत चालल्याने शेतकर्‍यांना धान्यविक्रीतूनदेखील चांगले पैसे मिळत आहेत. उन्हाळी हंगामातील बाजरी पिकाला मुळात पाणी कमीच लागते, त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाली तरी ही पिकावर त्याचा फारसा परिणाम होत नाही. बाजरी पिकापासून शेतकर्‍यांना खाण्यासाठी धान्य व जनावरांसाठी वैरण असा दुहेरी फायदा मिळतो. धान्य व वैरणविक्रीतून देखील शेतकर्‍यांना चांगले पैसे मिळतात.

Back to top button