कुदळेवाडीतील कोलरी तलाव काठोकाठ; ग्रामस्थांमध्ये समाधान | पुढारी

कुदळेवाडीतील कोलरी तलाव काठोकाठ; ग्रामस्थांमध्ये समाधान

पेठ(ता. आंबेगाव) ; पुढारी वृत्तसेवा : मार्च महिना मध्यावर आला असतानाही कुदळेवाडी येथील कोलरी डोंगराच्या पायथ्याला असलेल्या पाझर तलावात भरपूर पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाई भासण्याची शक्यता धूसर असून, शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यंदा सातगाव पठार भागात पावसाळ्यात नोव्हेंबरपर्यंत जोरदार पाऊस पडला. हा भाग उंचावर असल्याने पावसाचे पाणी वाहून जाते, मात्र अद्यापही कुदळेवाडी पाझर तलावात ऐन उन्हाळ्यात मुबलक पाणीसाठा आहे.

सध्या उन्हाळाच्या झळा सर्वत्र जाणवू लागल्या असताना कुदळेवाडीतील पाझर तलाव काठोकाठ भरलेला आहे, त्यामुळे येथील ग्रामस्थांना या तलाव व विहिरीद्वारे दररोज पाणीपुरवठा होत आहे. तसेच शेजारील भावडी गावालाही पाण्याची कमतरता भासत नाही.
दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी पाण्याचे नियोजन केले आहे. तलावातील पाणी शेतीसाठी वापरास मनाई केल्याचे शेतकरी प्रकाश कुदळे व डेअरी चेअरमन बाबाजी कुदळे यांनी सांगितले.

Back to top button